छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधातील वादातून एकाच संघटनेत काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्याने प्रियकर सचिन पुंडलिक औताडे (वय ३२) याचा खून केला. मामेभाऊ व मित्राच्या मदतीने मृतदेह प्लास्टिक ताडपत्रीत गुंडाळून कारमधून ५५ किलोमीटर जाऊन पैठणच्या पुलावरून गोदावरी नदीत फेकला. अहिल्यानगर गुन्हे शाखेने सलग पाच दिवस शहरात मुक्कामी राहत ७० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे व एका मोबाइल क्रमांकावरून प्रेयसी भारती रवींद्र दुबे (३४, रा. कॅनॉट प्लेस), तिचा मामेभाऊ दुर्गेश मदत तिवारी (रा. खुलताबाद) यांच्या साखरखेर्ड्यातील शेतातून मुसक्या आवळल्या.
भारती व सचिन चार वर्षांपासून एका संघटनेत काम करत होते. ती राज्य महिला प्रदेशाध्यक्ष असून, सचिन शहराध्यक्ष होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. ३१ जुलै रोजी दोघे जालन्याला एका विवाह समारंभात सहभागी झाले. शहरात परतल्यानंतर त्यांनी दारू खरेदी केली. कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटवर बसलेले असताना तेथे तिचा मामेभाऊ दुर्गेशही सहभागी झाला. भारतीने मध्यरात्री अफरोजलादेखील बाेलावून घेतले. तेव्हा त्यांच्यात वाद उफाळले. तिघांनी बेदम मारहाण करत सचिनच्या पूर्ण शरीरावर चाकूने वार करत गळा कापून जिवे मारले.
दोन टॅटूवरून ओळख पटलीकुटुंब सचिन यांचा शोध घेत असताना १३ ऑगस्ट रोजी शेवगावलगत मुंगी येथील गोदापात्रात सचिन यांचा मृतदेह आढळला. मानेच्या उजव्या बाजूस भक्ती, तर हातावर सचिन नाव गोंदलेले होते. यामुळे ओळख पटली. शरीरावर गंभीर वार असल्याने ती हत्याच असल्याचे स्पष्ट होते. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले.
१३ दिवसांनंतर १४ किलोमीटरवर मृतदेह-मित्रांच्या चौकशीत भारतीचा उल्लेख होताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी तिचा शोध सुरू केला.-३१ जुलै रोजीपासून भारतीदेखील फ्लॅटवर परतली नसल्याचे कळताच सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले. रात्री १:३० वाजता तिघेही प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला मृतदेह घेऊन जाताना दिसले. भारती, अफरोज समोर, तर दुर्गेश मागे बसला होता.-साधारण तीन वाजण्याच्या सुमारास पैठणच्या पुलावरून त्यांनी मृतदेह हातपाय बांधून गोदावरीत फेकला.-१३ दिवसांनंतर १४ किलोमीटरवर मृतदेह मुंगी गावातील पात्रापर्यंत वाहत गेला.
८० पेक्षा अधिक फुटेज आणि एक मोबाइल क्रमांकअहिल्यानगर गुन्हे शाखेने भारतीचा शोध सुरू केला. भारतीने सर्व मोबाइल बंद केले होते. १ ऑगस्ट रोजी दोघांना साखरखेर्ड्यात साेडून अफरोज पसार झाला. चार दिवसांपूर्वी तो चिकलठाण्याच्या वाहन बाजारात येऊन गेल्याचे कळताच पथकाने धाव घेतली. मात्र, तो निसटला. पथकाने शहरात मुक्काम ठोकत ८० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याच दरम्यान भारतीने एका मित्राला कॉल केला. त्या एका क्रमांकावरून पोलिसांनी साखरखेर्ड्यात नातेवाइकाच्या शेतातून तिच्या मुसक्या आवळल्या.
यांनी केली गुन्ह्याची उकलउपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमीझ राजा आतार, प्रशांत राठोड, भगवान धुळे, सारिका दरेकर.
तिघे काय करतात?भारती पतीपासून विभक्त झाली असून, एकटी कॅनॉट प्लेसमध्ये राहते. भाऊ असल्याचा दावा करणारा दुर्गेश फार्मसीचे शिक्षण घेऊन एका औषधी कंपनीत नोकरीला आहे. अफरोज वाहन खरेदी-विक्री एजंट आहे.