वाहन निरीक्षकांच्या नेमणूका औरंगाबादच्या; काम करताहेत मुंबईत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 19:46 IST2019-06-26T19:44:09+5:302019-06-26T19:46:15+5:30
वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात २७ मोटार वाहन निरीक्षक कार्यरत होते; परंतु संख्या आजघडीला अवघी ७ वर आली आहे.

वाहन निरीक्षकांच्या नेमणूका औरंगाबादच्या; काम करताहेत मुंबईत!
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील पाच मोटार वाहन निरीक्षक वर्षभरापासून प्रतिनियुक्तीवर मुंबईत कामकाज करीत आहेत. काम मुंबईत आणि वेतन औरंगाबादेतून अशी परिस्थिती आहे. यात भर म्हणून महिनाभरापूर्वी सहा निरीक्षकांची बदली झाली आणि आरटीओ कार्यालयातील एक-एक कामकाज मनुष्यबळाअभावी विस्कळीत होत आहे. त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे.
परिवहन विभागाने मे २०१८ मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती दिली. या पदोन्नतीने औरंगाबादला ११ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे आरटीओ कार्यालयाचे मनुष्यबळ वाढण्याची चिन्हे असतानाच पाच निरीक्षकांची प्रतिनियुक्ती मुंबईला करण्यात आली. गेल्या वर्षभरापासूनच ते मुंबईत काम करीत आहेत. वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात २७ मोटार वाहन निरीक्षक कार्यरत होते; परंतु संख्या आजघडीला अवघी ७ वर आली आहे.मनुष्यबळाअभावी शिकाऊ वाहन परवाना, पक्का वाहन परवाना, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, नवीन वाहन नोंदणी, भरारी पथक, विविध शासकीय बैठका अशा विविध कामांची जबाबदारी निरीक्षकांना पार पाडावी लागत आहे.
या सगळ्या परिस्थितीत किमान मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांना औरंगाबादेत परत पाठविण्याची आवश्यकता आहे; परंतु परिवहन विभागाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते म्हणाले, मनुष्यबळ मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
मोटार वाहन निरीक्षकांची परिस्थिती
मंजूर पदे - ३०
भरलेली होती -२४
मुंबईत प्रतिनियुक्ती - ५
निलंबित (नंतर इतर ठिकाणी बदली) - ५
सेवानिवृत्त - १
बदली -६
सध्या कार्यरत -७
सहाय मोटार वाहन निरीक्षकांची स्थिती
मंजूर पदे - ४०
भरलेली - ५
या कामांवर झाला परिणाम
शिकाऊ वाहन परवाना - रोज २०० ऐवजी १०० जणांची चाचणी.
कायमस्वरूपी परवाना - रोज २४० ऐवजी १३० जणांची चाचणी.
फिटनेस तपासणी - रोज १४८ जणांना अपॉइंटमेंट.
नव्या वाहनांची नोंदणी -शोरूमऐवजी आरटीओ कार्यालयात