कुणीही या, दारु घेऊन जा !
By Admin | Updated: December 31, 2014 01:03 IST2014-12-31T00:47:28+5:302014-12-31T01:03:27+5:30
सोमनाथ खताळ/ राजेश खराडे ल्ल बीड थर्टीफर्स्टच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी शौकिन घड्याळाकडे अक्षरश: डोळे लावून बसले आहेत़

कुणीही या, दारु घेऊन जा !
सोमनाथ खताळ/ राजेश खराडे ल्ल बीड
थर्टीफर्स्टच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी शौकिन घड्याळाकडे अक्षरश: डोळे लावून बसले आहेत़ ‘जब मिल बैठेंगे तीन यार’ म्हणत मैफिल अधिक रंगतदार करण्यासाठी ‘थोडी- थोडी पिया करो’ चा आग्रह होणारच आहे़ त्यामुळे स्थळ, वेळ निश्चित करुन ‘माल’ घेऊन ठेवण्यासाठी मंगळवारी देशी-विदेशी दारु दुकानांवर शौकिनांच्या रांगा होत्या़ मात्र, ‘पिण्या’साठी परवाना घ्यावा लागतो याचा अनेकांना विसर पडला आहे़ गल्ला भरण्याच्या नादात विके्रतेही ग्राहकाकडील परवाना, वय याची कुठलीच खातरजमा करत नाहीत़ ‘लोकमत’ने ‘थर्टी फर्स्ट’च्या पूर्वसंध्येला केलेल्या स्टिंगमधून ही धक्कादायक बाब पुढे आली़
असे केले स्टिंग...
‘लोकमत’ प्रतिनिधी शहरातील दारुदुकानांमध्ये ग्राहक बनून गेले़ दारू विक्रीसाठी व पिण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घेणे अवश्यक असते. मात्र शहरासह ग्रामीण भागात परवान्याची खात्री न करताच दारू विक्री करतात, असे आढळले़ दारू घेण्यासाठी सुटाबुटातल्यांपासून ते लोकांना सुरक्षितता देण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांपर्यंत सर्वांचीच गर्दी होती. एका दुकानावर तर दोन शाळकरी मुलेही रांगेत होती. हे सर्व कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.
पोलिसांसमोर मद्यपींचा धिंगाणा
शहरातील काही निवडक दुकानांची पाहणी केली असता, पोलीसांसमोरच मद्यपींचा धिंगाणा चालु होता. नियमानूसार कोणी जर सार्वजनीक ठिकाणी अथवा, रस्त्यावर धिंगाना घालत असेल तर त्याला समंस किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते.
कुठलीही विचारपूस नाही
नगर नाक्यावरील त्याच दुकानात आम्ही प्रवेश केला. यावेळी दारू बॉटल मागीतली. यावेळी त्याने मागेपुढे न पाहता आमच्यासमोर ‘टँगो’ ठेवली. ४० रूपये मागीतले. अक्षरश: दारू खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र येथे येणाऱ्या कुठल्याच नागरीकाला परवान्याची विचारपूस करण्यात येत नव्हती.
बिअर बारमध्येही नाही विचारपूस
शहरातील काही बिअर बारमध्येही चमूने भेटी दिल्या. मात्र कुठल्याच प्रकारची विचारपूस न करता वेटर ने तीन ग्लास समोर मांडले. आणि सांगा साहेब कुठला ‘पॅक’ आणायचा. यावर आम्ही संबंधीताला परवाना विचारत नाहीत का? असे विचारल्यावर तो बिनधास्तपणे नाही म्हणाला. यावरून बिअर बारवालेही किती बिनधास्त आहेत, हे पहावयास मिळते.
गतवर्षी २० हजार किमतीचे परवाने
जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी व मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे ३ लाख लीटर दारूचा स्टॉक झाला असल्याचे समजते. ग्राहकांजवळ दारू बरोबर पेयाचा परवाना असणेही आवश्यक आहे. गतवर्षी केवळ २० हजार किमतीच्या परवान्यांची विक्री करण्यात आली असल्याचे येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
परवान्याविनाच विक्री
ग्राहकांना राज्य उत्पादन शुल्क किंवा दारू खरेदीच्या ठिकाणाहून मद्यपान करण्याचा परवाना दिला जातो. मात्र शहरातील जवळपास ४० परमीट-रूम, १८ देशी दारूच्या दुकाने तर ६० बीअर-शॉपी मध्ये ग्राहकांकडे परवाने नसतानाही दारू विकली जाते.
परवान्याचे शुल्क असे
राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून मद्य शौकिनांसाठी परवाने दिले जातात. एक दिवसाच्या देशी दारूकरिता २ रुपये तर विदेशी करिता ५ रुपयाचा परवाना घेणे ग्राहकांना बंधनकारक असते. तर १०५० रुपये भरून ग्राहकाला जीवनभर दारू पिण्याचा परवाना दिला जातो.
जिल्ह्यात ७८ देशी दारू दुकाने
जिल्ह्यात केवळ ७८ देशी दारुच्या दुकानांना दारू विक्रीचा परवाना आहे. मात्र ग्रामीण भागातील गल्ली बोळात अवैध दारू विक्री होत असताना दिसत आहे.