फेसबुकवर पोस्टप्रकरणी अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 19:27 IST2019-01-11T19:27:36+5:302019-01-11T19:27:55+5:30
राजकीय नेत्याविरुद्ध सोशल मीडियावर व्यंगचित्र आणि इतर मजकूर पोस्ट केला म्हणून मारहाण करून धमकी दिल्याच्या प्रकरणात दीपक डोंगरे याला खंडपीठाचे न्या. व्ही.के. जाधव यांनी १५ हजारांच्या वैयक्तिक बंधपत्रासह इतर अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

फेसबुकवर पोस्टप्रकरणी अटकपूर्व जामीन
औरंगाबाद : राजकीय नेत्याविरुद्ध सोशल मीडियावर व्यंगचित्र आणि इतर मजकूर पोस्ट केला म्हणून मारहाण करून धमकी दिल्याच्या प्रकरणात दीपक डोंगरे याला खंडपीठाचे न्या. व्ही.के. जाधव यांनी १५ हजारांच्या वैयक्तिक बंधपत्रासह इतर अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियाप्रमुख भीमराव डिगे यांनी चंदनझिरा (जालना) पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डिगे यांना ‘आमदारांविरुद्ध फेसबुकवर पोस्ट का टाकतो’, असे म्हणत १२ नोव्हेंबर २०१८ रोजी मारहाण करून धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात दीपक डोंगरेंविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी दीपक डोंगरेने अटकपूर्व जामिनासाठी जालना सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर डोंगरे यांनी खंडपीठात धाव घेतली. सुनावणीअंती खंडपीठाने न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी १५ हजारांच्या वैयक्तिक बंधपत्रासह, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत डोंगरेने दर रविवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात सकाळी आठ ते अकरा या वेळेत हजेरी लावावी, साक्षीदारांवर दबाव आणू नये या अटी व शर्तींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. जॉयदीप चॅटर्जी आणि अॅड. रवींद्र गोरे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. आश्पाक पठाण आणि अॅड. चंद्रकांत बोडखे यांनी सहकार्य केले.