घाटी रुग्णालयात संपली अॅन्टीरेबीज सिरम
By Admin | Updated: July 15, 2014 01:00 IST2014-07-15T00:37:58+5:302014-07-15T01:00:54+5:30
औरंगाबाद : सर्पदंशावरील लस न मिळाल्याने एक बालिका दगावल्याची घटना ताजी असतानाच श्वानदंशानंतर घाटीत उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना अॅन्टीरेबीज सिरम नसल्याचे सांगण्यात आले.
घाटी रुग्णालयात संपली अॅन्टीरेबीज सिरम
औरंगाबाद : सर्पदंशावरील लस न मिळाल्याने एक बालिका दगावल्याची घटना ताजी असतानाच श्वानदंशानंतर घाटीत उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना अॅन्टीरेबीज सिरम नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याने लचका तोडल्यानंतर ही सिरम रुग्णास द्यावीच लागते.
रुग्णालयाला औषध खरेदीसाठी शासनाकडून मिळणारा निधी अत्यल्प असल्याने बाराही महिने तेथे कोणत्या ना कोणत्या औषधाचा तुटवडा जाणवत असतो. साधारणत: महिनाभरात श्वानाने लचके तोडलेले ३०० ते ४०० रुग्ण घाटीत दाखल होतात. श्वानदंशानंतर अॅन्टीरेबीज व्हॅक्सिन आणि अॅन्टीरेबीज सिरम ही दोन औषधी रुग्णास द्यावी लागते. यातील अॅन्टीरेबीज सिरम हे इंजेक्शन महागडे असल्याने सर्वसामान्यांना ते परवडत नाही. परिणामी, श्वानदंश झालेले रुग्ण थेट घाटीत दाखल होतात. घाटी रुग्णालयास अॅन्टीरेबीज सिरम पुरवठा करणाऱ्या एजन्सीची मुदत संपलेली आहे आणि शासनाने नवीन पुरवठादारासोबत रेट-कंत्राट केलेला नाही. त्यामुळे घाटी प्रशासनाला अॅन्टीरेबीज सिरम खरेदी करता आले नाही. उपलब्ध साठाही दोन दिवसांपूर्वीच संपला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. गट्टाणी यांनी याविषयी सांगितले की, अॅन्टीरेबीज सिरम संपल्यानंतर आम्ही लोकल पर्चेस केले आहे.
सिडको, हडकोत ८ जणांना चावा
सोमवारी सिडको, हडको आणि हर्सूल भागांत मोकाट श्वानांनी ८ सामान्यांचे लचके तोडले. यात एका महिलेचा समावेश आहे. त्यापैकी काही रुग्ण घाटीत उपचारासाठी दाखल झाले.
रुग्ण घाटीत दाखल झाले तेव्हा अॅन्टीरेबीज सिरम नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. परिणामी, अनेक रुग्ण तेथून खाजगी रुग्णालयात गेले. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.