आणखी २३९५ हज यात्रेकरू रवाना
By Admin | Updated: September 6, 2016 01:06 IST2016-09-06T01:03:43+5:302016-09-06T01:06:13+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील २३९५ हज यात्रेकरू ९ विमानांद्वारे पवित्र हज यात्रेला रवाना झाले. सोमवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेवटचा जथा रवाना झाला.

आणखी २३९५ हज यात्रेकरू रवाना
औरंगाबाद : मराठवाड्यातील २३९५ हज यात्रेकरू ९ विमानांद्वारे पवित्र हज यात्रेला रवाना झाले. सोमवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेवटचा जथा रवाना झाला. खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फेही मराठवाड्यातील यात्रेकरू मोठ्या संख्येने हजला रवाना झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक जामा मशीद परिसरात हज कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र हज कमिटी आणि मरकज-ए-हुज्जाज कमिटीतर्फे या कॅम्पचे आयोजन केले होते. सर्व यात्रेकरूंना प्रशिक्षण देण्यात आले होते. ३० आॅगस्टपासून हज यात्रेकरूची रवानगी सुरू झाली. दररोज २७५ यात्रेकरू एका विमानाद्वारे रवाना होत होते. सोमवारी शेवटचा जथा रवाना झाला. हज कॅम्प येथूनच यात्रेकरू ‘अहेराम’बांधून चिकलठाणा विमानतळावर दाखल होत होते. तेथे चलन बदलणे आदी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत होती. हज कॅम्प आणि विमानतळावर कोणताच त्रास यात्रेकरूंना होणार नाही, याची काळजी स्वयंसेवक घेत होते. यात्रेकरूंच्या सेवेसाठी हुज्जाज कमिटीने मोठ्या संख्येने स्वयंसेवकांची फौज तैनात केली होती. एकाही यात्रेकरूला बॅगही उचलण्याची तसदी स्वयंसेवक घेऊ देत नव्हते.