अण्णा भाऊंनी दिले जगण्याचे बळ
By Admin | Updated: August 1, 2014 00:29 IST2014-08-01T00:13:03+5:302014-08-01T00:29:04+5:30
जालना : आपल्या साहित्यातून उपेक्षित माणसातील नायक आणि नायिकांना जगासमोर आणून त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून देणारे अण्णा भाऊ साठे हे जगण्याचे व्यक्तिमत्त्व आहे, अ
अण्णा भाऊंनी दिले जगण्याचे बळ
जालना : आपल्या साहित्यातून उपेक्षित माणसातील नायक आणि नायिकांना जगासमोर आणून त्यांच्यातील लढाऊ वृत्ती दाखवून देणारे अण्णा भाऊ साठे हे जगण्याचे व्यक्तिमत्त्व आहे, असे प्रतिपादन बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले यांनी येथे केले.
जालना येथील लोकमंगल प्रतिष्ठानतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्त्या आयेशा खान तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाबाई लोंढे, प्रमोद खरात, विजय पवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी आपले विचार मांडताना तोकले म्हणाल्या की, अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका व स्त्री पात्रे ही कणखर आहेत. संघर्षशील आहेत. आशावादी आहेत. अण्णा भाऊ साठे साहित्याची समीक्षा ही देशाचे स्वातंत्र्य स्त्रियांचे शील व पुरूषांचा स्वाभिमान या तीन महत्त्वाच्या निकषावर करावे लागते. कारण महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आशय त्यांच्या साहित्यातून अभिव्यक्त झालेला आहे. धर्म आणि पुरूषसत्ताक संस्कृतीने महिलांच्या जगण्यावर अनेक बंधने घातली, सासर आणि माहेर यांच्या प्रतिष्ठेपायी तिच्यावर होणारे अन्याय-अत्याचार स्त्री निमूटपणे सहन करते. मात्र सर्व समानता असणाऱ्या विधवा, परितक्ता, तरूण महिलाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड कसे करायचे ? हे अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातील बंडखोर नायिकांच्या रूपाने दाखवून दिले आहे. अण्णा भाऊंच्या कथा, कादंबऱ्यातील स्त्री दर्शन वेगळे असे वाटते कारण ते सत्य वर्णन आहे.
अन्यायाविरोधात संघर्ष करणारी स्त्री अण्णा भाऊंनी रेखाटली आहे. अण्णा भाऊंचे सामाजिक विचार तसेच परिवर्तनवादी विचार आत्मसात करण्याची आज नितांत गरज आहे. अण्णा भाऊंचे साहित्य व त्यांचे सामाजिक जीवन हे जगण्याचे व्यक्तिमत्व आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या आयेशा खान यांनी परिवर्तनवादी विचार पेरण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्त्यांनी करणे गरजचे असून, विचारमाला तसेच विचारमंथनातूनच सामाजिक परिवर्तन घडू शकेल. उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी सामाजिक चळवळी गतिमान करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाबाई लोंढे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खरात यांनी आपले विचार मांडले. प्रारंभी व्याख्यानमालेच्या वतीने अॅड.संजीव देशपांडे, रंजना भाले, अशोक घोडे, लक्ष्मी चांदोडे, मिलींद सावंत, प्रशांत आढाव आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अॅड.बी.एम.साळवे, सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगातिवरे, अॅड.कैलास रत्नपारखे, अॅड. कल्पना त्रिभुवन, प्रशांत नवगिरे, बबनराव कसबे, हरेश रत्नपारखे, किरण सिरसाठ, शेख इब्राहीम, गणेश चांदोडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व महिला यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
साहित्य दर्जेदार
अण्णा भाऊ साठे साहित्याची समीक्षा ही देशाचे स्वातंत्र्य, स्त्रियांचे शील व पुरूषांचा स्वाभिमान या तीन महत्त्वाच्या निकषांवर करावे लागते. कारण महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आशय त्यांच्या साहित्यातून अभिव्यक्त झालेला आहे.