जनावरे दगावली, घरावरील पत्रे उडाले
By Admin | Updated: June 7, 2014 00:23 IST2014-06-07T00:10:09+5:302014-06-07T00:23:31+5:30
विजय मुंडे, उस्मानाबाद निसर्गाचे तांडव काय असते, याचा अनुभव मेडसिंगा (ता़उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांना गुरूवारी आला़ वादळी वाऱ्यासह भर दुपारी बरसलेला पाऊस म्हणजे
जनावरे दगावली, घरावरील पत्रे उडाले
विजय मुंडे, उस्मानाबाद
निसर्गाचे तांडव काय असते, याचा अनुभव मेडसिंगा (ता़उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांना गुरूवारी आला़ वादळी वाऱ्यासह भर दुपारी बरसलेला पाऊस म्हणजे जणू काही त्सुनामीच होती़़ शेकडो झाडांसह विद्युत खांबही जमीनदोस्त झाले़ शाळेची अवस्था बिकट झाली़ नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या़ मेडसिंगा येथे शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांची जनावरांवर उपचार करण्यासह गोठे, घरांची दुरूस्ती करण्यासाठी सुरू असलेली लगबग दिसून आली़ अनेकांनी रात्रीचे कटू अनुभव व्यक्त केले़
जिल्ह्याला मार्च अखेरपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले़ कारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ अवकाळीचा धिंगाणा थांबतो न् थांबतो तोच मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे़ जिल्ह्यातील बहुतांश गावात गुरूवारी दुपारीच वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला़ मेडसिंगा व परिसराला या वादळी वारे, पावसाने झोडपून काढले़ मुख्य मार्गावरून गावात वळल्यानंतरच वीज कंपनीच्या ३३ केव्हीचे विद्युत पोल रस्त्याच्या कडेलाच जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले़ मोजकेच कर्मचारी त्यावेळी दुरूस्तीच्या कामाला लागली होती़ तेथून पुढे जाताच जीवन दिगंबर आगळे यांची बैलजोडी, सुभाष रामकृष्ण साळुंके यांचे बैलजोडी जवळपास ८०० मीटरवरून पत्रे उडून आल्याने गंभीर जखमी झाले़ तर पोपट आगळे यांचे विटांनी बांधलेले शेड उद्ध्वस्त झाल्याने बळी चौरे, जगदीश साळुंके यांच्या १० शेळ्या जागीच ठार झाल्या़ उपस्थितांनी गुरूवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याची चित्तरकथा शब्दात सांगता येणार नाही, असे सांगितले़ तर भागवत शित्रे यांचेही शेतातील घर जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले़
गावात प्रवेश करताच कोसळलेल्या भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली दिलीप गवारे यांची भरडण्याची मशीन चक्काचूर झाल्याचे दिसून आले़ मशीन चक्काचूर झाली माणसं असती तर कोणच बचावले नसते, अशी चर्चा झाडाकडे पाहणारा प्रत्येकजण करीत होता़ तेथून पुढेच असलेली व मुख्याध्यापक शिक्षकांनी मेहनतीतून सजविलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मोठी दुरवस्था झाल्याचे दिसून आले़ शाळेवरील पत्रे उडून कोठे गेले याचा थांगपत्ता गुरूजींना लागला नाही़
परिसर धुंडाळून काढला तरी पत्रे दिसून आले नाहीत़ यातील काही पत्रे ग्रामस्थांपैकी कोणीतरी चोरल्याचा आरोप करण्यात आला़ शाळेच्या पाठीमागे असलेले मोठे किचनशेड वादळी वाऱ्यात चेंडू उडाल्याप्रमाणे उडून परिसरातील झाडांवर, खेळण्यांवर जाऊन पडले़ शाळेच्या परिसरातील झाडेही उन्मळून पडली होती़ या वादळी तडाख्यात शाळा सुरू होण्याच्या तोंडावरच शाळेचे लाखो रूपयांचे नुकसान झाले़
शित्रे यांचे घर, गावालगतच असलेले चंद्रकांत कदम यांच्या गोठ्यावर पडलेले झाड आणि त्यातून बचावलेली जनावरे ही परिस्थिती भयानक होती़ गावात प्रत्येक गल्लीत अनेकांचे मोठे नुकसान झाले होते़ भर दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला होता़ विजांचा कडकडाट आणि ओरडणारी जनावरे पाहता सर्वसामान्यांची विशेषत: महिला, बालकांची अवस्था बिकट झाली होती़ पाऊस थांबल्यानंतर मात्र, उजाड झालेले गाव आणि शिवार पाहून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता़ प्रशासनाच्या वतीने मेडसिंगा येथील पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले होते़
बेंबळी मार्गावर झाडे कोसळली
वादळी वाऱ्यामुळे उस्मानाबाद- बेंबळी मार्गावर मोठ्याप्रमाणात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली होती़ त्यामुळे रात्री उशिरापर्यंत व शुक्रवारी दुपारपर्यंत वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता़ महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी, ग्रामस्थांनी झाडे तोडून बाजूला केल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली़ बुधवारी रात्री या मार्गावरून वाहने नेताना अनेकांना मोठी कसरत करावी लागली़
वाहनांचे नुकसान, तिघे जखमी
मेडसिंगा येथील उमराव पडवळ, सदाशिव माने हे दोघे गुरूवारी दुपारी शेतशिवारात जनावरे चारीत होती़ दुपारी अचानक पाऊस सुरू झाला़ वादळी वाऱ्यामुळे पडवळ, माने हे दोघेही फेकले गेल्याने जखमी झाले़ शिवाय अन्य एकाची चारचाकी गाडी, राजेंद्र भोरे यांची दुचाकीही या वादळी वाऱ्यात कोसळली. शेतातून परतणारी एक मुलगीही वाऱ्यामुळे पडल्याने जखमी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़
वीजपुरवठ्यासाठी प्रयत्नशील
वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने काही भागातील वीजपुरवठा दक्षतेसाठी बंद करण्यात आला होता़ त्या पावसात बेंबळीकडे गेलेल्या ३३ केव्हीचा वीजपुरवठा अगोदर सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत़ त्यामुळे तीन विद्युत उपकेकंद्रावरील वीजपुरवठा बंद असल्याने १८ गावातील वीजपुरवठा बंद आहे़ प्रारंभी ती लाईन दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यानंतर मेडसिंगा व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे़ कालच्या पावसात वीज कंपनीचेही लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे ग्रामीणचे सहाय्यक अभियंता थोरात यांनी सांगितले़़
१८ गावे अंधारात
उस्मानाबाद येथून बेंबळीकडे गेलेल्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे ६ ते ८ खांब पडल्याने बेंबळी, केशेगाव, रूईभर या सबस्टेशनचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता़ त्यामुळे तब्बल १८ गावांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली़ तर मेडसिंगा व शिवारातील महावितरणचे जवळपास ५०० ते ६०० विद्युत खांब कोसळले आहेत़ मेडसिंगा गावातील वीजपुरवठा कधी सुरळीत होईल हेही नक्की सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य वाहिनीचा पुरवठा पूर्ववत करण्याचे काम अगोदर हाती घेतले होते़ त्यानंतर मेडसिंगा गाव व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे़
५० कोंबड्यांचा पत्ता नाही
पंधरा-वीस वर्षापूर्वी झालेली गारपीट मी पाहिली आहे़ पण असला वारा आजपर्यंत कधीच पाहिला नाही़ या वाऱ्यामुळे दुरून उडून आलेला पत्रा लागल्याने वेतास आलेल्या म्हशीचा पाय फाटला आहे़ तीला १८ टाके पडले आहेत़ घरासमोरील रामराव जाधव यांचे घरावरील पत्रे उडून गेल्याने सर्व सामान उघड्यावर ठेवले आहे़ घरासमोर चरत असलेल्या कोंबड्या वाऱ्यात कागदासारख्या उडून गेल्या़ माझ्या ५० कोंबड्या कुठे गेला याचा पत्ता लागला नसल्याचे मैनाबाई जाधव यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले़
रात्र शेजाऱ्याच्या घरात काढली
दुपारी पाऊस सुरू झाला त्यावेळी माझ्या आई-वडिलांसह कुटुंबातील व्यक्ती व चार मुलं घरात होतो़ शेतात पत्र्याचे घर असल्याने वाऱ्यामुळे ते उडून गेले़ त्यावेळी काय करावे हे कोणालाच सुचत नव्हते़ बाजूलाच असलेला विजेचा खांब व ताराही तुटून पडल्या़ मुलांचा रडण्याचा आवाज आणि जोराचे वादळ, पाऊस त्यामुळे कुठे थांबावे, काय करावे हे समजत नव्हते़ काही काळाने पाऊस थांबला़ मात्र, तोपर्यंत आमच्या घराचे मोठे नुकसान झाले होते़ शेजारील बुजगुडे यांच्या घरी आम्हाला रात्र काढावी लागल्याचे शेतकरी आत्माराम कांबळे म्हणाले.
दुर्मिळ ग्रंथही भिजले
जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला तेव्हा मी घरी होतो़ पाऊस आणि वाऱ्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते़ गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला़ पाऊस उघडल्यानंतर मी ग्रंथालय उघडून पाहिल्यानंतर सर्वच पुस्तके भिजल्याचे दिसून आले़ पत्रे उडून गेल्याने आतमध्ये पाणी शिरले. दुर्मिळ ग्रंथासह येथील सर्वच १११९ पुस्तके, ग्रंथ भिजली आहेत़ ग्रंथालयातील एकही पुस्तक कोरडे राहिले नसल्याचे श्री संत तुकाराम महाराज सार्वजनिक वाचनालयाचे मनोज जाधव यांनी सांगितले़
भूकंपापेक्षाही भीतीदायक
काल आलेले वारे अन् पाऊस हा भूकंपापेक्षाही भयानक होता़ माझ्या लहान मुलासह आम्ही चौघे घरात होतो़ मात्र, अचानक आलेल्या वादळी वारे, पावसामुळे आमच्या जिवाचा ठेका चुकला होता़ अनेकांचे पत्रे उडत असलेला आवाज येत होता़ काहींची आरडाओरड सुरू होती़ कोण कुठे आहे, कोठे काय चालू आहे़ कुठे काय झाले आदी प्रश्नांमुळे जिवाची घालमेल सुरू होती़ त्याचवेळी आमच्या घरावरील पत्रे उडून गेले़ टीव्ही, फ्रीज भिजले, ज्वारी, गहू आदी भिजले आला आपले काय खरे नाही ? असा प्रश्न मनात आल्याचे विकास गोरे यांनी सांगितले़
मेहनत पाण्यात गेली
माझ्यासह सहकारी शिक्षकांनी मोठ्या परिश्रमातून शाळेच्या परिसरात शेकडो झाडे लावली होती़ गत उन्हाळ्यात यातील काही झाडे कोमेजून गेली असली तरी इतर अनेक झाडे जगली आहेत़ झाडे जगविण्यासाठी उस्मानाबादहून काहीवेळा पाणी मागवून झाडांना देण्यात आले़ मात्र, गुरूवारी दुपारी झालेल्या वादळी पावसात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत़ शाळेच्या सहा खोल्यांवरील पत्रे उडून गेले आहेत़ कीचनशेडही हवेमुळे उडून गेल्याने शाळेचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे जि़प़प्राक़न्या शाळेचे मुख्याध्यापक के़एम़लगदिवे यांनी सांगितले़
नशीब बलवत्तर म्हणून बचावलो
आमच्या घरावर शेजारीच असलेले वडाचे मोठे झाड पडले़ अचानक पत्रे उडून गेल्याने मोठमोठी दगडे खाली पडली़ आम्ही पती-पत्नी व एक दीड वर्षाची मुलगी घरात होतो़ वाऱ्याचा आवाज, पाऊस यामुळे काय होतेय हे कळतच नसल्याने मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ पत्नीला मुलीला घेऊन पलंगाखाली जाण्यास सांगितले़ तत्पूर्वीच पलंगावर दगड पडल्याने तो वाकडा झाला़ पाऊस थांबल्यानंतर बाहेरील लोकांनी झाडाच्या फांद्या तोडून आम्हाला बाहेर काढले़ नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो, असे विलास शित्रे म्हणाले.
वाघोली, चिखलीतही पावसाचा कहर
उस्मानाबाद : तालुक्यातील वाघोली, चिखली या गावांनाही गुरूवारी दुपारी झालेल्या वादळी वारे, पावसामुळे मोठा फटका बसला़ अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, शाळेवरही पत्रा राहिला नाही़ वाघोली परिसरातील बागायतदारांनाही या पावसाचा, वाऱ्याचा कहर सहन करावा लागला असून, त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले़
वाघोली येथील शिवाजी मते यांच्या शेतातील जनावरांच्या पत्र्याच्या शेडवर झाड उन्मळून पडले़ मात्र, ऐनवेळी जनावरे बाहेर काढल्याने मोठे नुकसान टळले़ तानाजी शिंदे यांची पपईची शेती पूर्णत: उध्दवस्त झाली आहे़ तर धर्मा कसबे, दिगंबर कसबे यांच्या घरावर झाडे पडल्याने भिंतींना तडे गेले आहेत़ गोपीनाथ गायकवाड यांच्याही घरावरील पत्रे उडून गेले तर तानाजी शिंदे, सुरेश पाटील यांची पपईची शेती, सुनील खडके यांची केळीची बाग पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याने या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़ तसेच शिवपार्वती कन्या शाळेच्या चार खोल्यांवरील पत्रे उडून गेल्याने शाळेलाही पावसाचा फटका बसला आहे़ गावात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली मात्र सुदैवाने ती मोकळ्या जागेत पडल्याने कोणतीही मोठी हानी झाली नाही़ चिखली गावातही पावसासह वाऱ्यामुळे मोठ्या नुकसानीचा सामना ग्रामस्थांना करावा लागला आहे़ चिखली येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडून गेले आहेत़ तर गोविंद वाघमारे यांच्या शेतातील शेडचेही नुकसान झाले़ प्रभाकर चव्हाण यांचे गॅरेज, देविदास जाधव, नवनाथ सुरवसे, रामा जाधव, काशीनाथ लबडे आदींच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले़ पंचनाम्याअंती या गावातील नुकसानीची आकडेवारी समोर येणार आहे़ (प्रतिनिधी)
पंचनामे होईनात..!
गावच्या तलाठी रजेवर तर प्रभारी कारभार असलेले तलाठी शिंदे यांचा मोबाईल लागत नसल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या़ मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही कोणीच पंचनामे करण्यासाठी फिरकले नसल्याने अनेकांनी आपापल्या घराची डागडुजी सुरू केली होती़
वीजही गायब
वाघोली गावासह चिखली येथे गुरूवारी दुपारीच गुल झालेली वीज शुक्रवारी सायंकाळपर्यंतही गुल होती़ शेतशिवारात ठिकठिकठिकाणी विद्युत पुरवठ्याचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा बंद होता़ वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पोल दुरूस्त करून तातडीने वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांमधून होत आहे़
वीज पडून दोन बैल दगावले
शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात आवाडशिरपुरा येथे वीज पडून दोन बैल दगावल्याची घटना घडली.
या वादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब मोडले असून, झाडेही उन्मळून पडली आहेत. काही शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचेही मोठ्या प्रामणात नुकसान झाले. रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास आवाड शिरपुरा शिवारात मांजरा प्रकल्पाच्या कॅनॉलजवळ रतन शिवाजी भोसले यांच्या शेतात जांभळीच्या झाडाला बांधून ठेवलेल्या दोन बैलांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोन्ही बैल जागीच ठार झाले. ऐन पेरणीच्या तोंडावर दोन बैल दगावल्याने भोसले यांचे नुकसान तर झालेच. शिवाय पेरणीचा प्रश्नही उभा आहे. (वार्ताहर)
काक्रंबा, मोर्डा गावाला फटका
काक्रंबा : तुळजापूर तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसाचा फटका काक्रंबा आणि मोर्डा गावालाही बसला असून, मोर्डा शिवारात लिंबाची बाग पूर्णपणे जमीनदोस्त होवून मोठे नुकसान झाले. बुधवार व गुरूवार असे सलग दोन दिवस या भागात जोरदार पाऊस झाला. यात मोर्डा येथील माणिक रामचंद्र मदने यांच्या घरावर वीज पडून पत्रे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. (वार्ताहर)