...संप मागे घेतल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांत नाराजी...!
By Admin | Updated: July 13, 2014 00:45 IST2014-07-13T00:35:10+5:302014-07-13T00:45:23+5:30
औरंगाबाद : राज्यातील १२ हजार वैद्यकीय अधिकारी सलग आठ दिवस संपावर गेल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडून गेली होती.

...संप मागे घेतल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांत नाराजी...!
औरंगाबाद : राज्यातील १२ हजार वैद्यकीय अधिकारी सलग आठ दिवस संपावर गेल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडून गेली होती. डॉक्टरांच्या मागण्या तडकाफडकी मार्गी लागतील, असे वातावरण असताना पुन्हा एकदा शासनाच्या आश्वासनानंतर मॅग्मो संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेतला. या निर्णयामुळे मॅग्मो संघटनेचे सदस्य असलेल्या राज्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अनेक डॉक्टर संघटना सोडण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यत: ग्रामीण आणि आदिवासी भागात जाऊन साथरोग असो किंवा लसीकरणासारखे राष्ट्रीय काम, जीवाची पर्वा न करता पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी झटतात.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १२ हजार राजपत्रित वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यापैकी अनेक वैद्यकीय अधिकारी १० ते १५ वर्षे अस्थायी म्हणून कार्यरत होते. २००८ मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले होते. २००९-१० मध्ये शासन सेवेत समावेश न झालेल्या डॉक्टरांना पूर्वलक्षी लाभाने वेतनवाढ द्यावी, अस्थायी ७८९ बी. ए. एम. एस. डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी व अस्थायी ३२ बी. डी. एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गट ‘ब’मध्ये सेवा समावेशन करावे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे, बी. ए. एम. एस. डॉक्टरांना पदोन्नती द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या
होत्या.
या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने वेळोवेळी आंदोलने केली होती. शासनाने प्रत्येक वेळी तोंडी आणि लेखी आश्वासने दिली. महिनाभरापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता करावी, यासाठी सुरू केलेला संप अंतिम टप्प्यात होता. आता आपल्या सर्व मागण्या मार्गी लागतील, अशी सर्व डॉक्टरांना अपेक्षा होती. शासनाकडून मेस्मा लागू करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतरही एकही वैद्यकीय अधिकारी अस्थिर झाला नव्हता. संपाच्या शेवटच्या दिवशी तर डॉक्टरांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवली होती. मात्र, अचानक मुंबईहून फोन आला आणि मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याचे सांगून संप मागे घेण्यात आल्याचे कळविण्यात
आले.
विशेष म्हणजे शासनाकडून मॅग्मो संघटनेला यापूर्वी ४३ वेळा आश्वासने मिळाली होती, असे संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी संप मागे घेण्यापूर्वी अध्यक्षांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते.
संप मागे घेण्याचा निर्णय चुकला
केवळ आश्वासनाच्या आधारे संप मागे घेण्याचा निर्णय चुकला आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय अधिकारी नाराज झालेले आहेत. संपातून काय साध्य केले ते ४ दिवसांत समजेल
-डॉ. संदीपान काळे, जिल्हाध्यक्ष, औरंगाबाद