हिमायत बागेला वाली कोण
By Admin | Updated: June 22, 2014 00:51 IST2014-06-22T00:38:52+5:302014-06-22T00:51:08+5:30
गजानन दिवाण , औरंगाबाद इतिहासाचा मोठा वारसा असलेली हिमायत बाग सध्या रिकामटेकड्यांचा बाजार बनली आहे.

हिमायत बागेला वाली कोण
गजानन दिवाण , औरंगाबाद
इतिहासाचा मोठा वारसा असलेली हिमायत बाग सध्या रिकामटेकड्यांचा बाजार बनली आहे. भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत कोणी मॉर्निंग-इव्हिनिंक वॉकच्या नावाखाली, कोणी हौसी फोटोग्राफीसाठी तर कोणी गांजा-दारूच्या पार्ट्यांसाठी या बागेची धूळ उडवतो. नागरिकांना दिलेले हे अति स्वातंत्र्य हिमायत बागेच्या जीवावर उठले आहे.
३५० एकर परिसरात पसरलेल्या या बागेचा काही भाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि काही भाग सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो. विद्यापीठाने या बागेत फळसंशोधनाचे काम मोठ्या जोमाने हाती घेतले आहे. मात्र, लोकांच्या अति हस्तक्षेपामुळे या बागेतील फळबागांसोबतच झाडे-झडुपे आणि पक्ष्यांवर संकटाचे मोठे ढग जमू लागले आहेत.
वेळ सकाळी सहाची. हिरव्यागार बागेतला कुठलाही कोपरा माणसांशिवाय दिसत नाही. कुठल्यातरी एका गेटला गाडी पार्क करायची आणि मनसोक्त निसर्गानंद घ्यायचा. तो घेत असतानाच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची आंबे तोडायची तर कधी जांभळे तोडायची. यासाठी मोठाल्या फांद्यांचा बळी घ्यायचा. तरीही कोणी हटकत नाही. फळसंशोधन केंद्राचा कुठलाच कर्मचारी तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे आंबे-जांभूळ तोडत असताना रस्ता सोडून रानात जायचे. वाटेत मोर-लांडोर नाचण्यात दंग असले तरी वाट नाही सोडायची. अगदी रस्त्यावरील भटके कुत्रे हाकलावे तसे त्यांनाच हाकलून द्यायचे...
मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची ही वर्दळ. त्यांची वेळ संपली की गांजा-दारू पिणाऱ्यांचा वॉक सुरू होतो. गवताआड, एखाद्या कोपऱ्यात आडोशाला पक्षी-प्राण्याने आपली जागा तयार करावी, अशा जागा या बहाद्दरांनी तयार केल्या आहेत. औरंगजेबाच्या काळात सुरक्षारक्षक जेथून टेहळणी करायचे, तिथे या लोकांची गांजा-दारूची पार्टी चालते. त्यांची ही दारू चढून उतरली तरी त्यांना कोणी उठा म्हणत नाही.
घरफोड्या-दरोडे यातले गुन्हेगार पोलिसांना शोधून-शोधून सापडत नाहीत. या आरोपींचेही निवांत वेळ घालविण्याचे हेच ठिकाण. जे वाट्टेल ते खायचे, कुठेही जायचे, कुठेही झोपायचे, असा त्यांचा रोज उद्योग सुरू असतो.
नागरिकांवर बंधने आणा
या बागेत मनसोक्त वावरणाऱ्या नागरिकांवर बंधने आणण्याची गरज आहे. निसर्गाला बाधा पोहचेल असे कुठलेही वर्तन त्यांनी करता कामा नये. असे झाले तरच हिमायत बागेचे वैभव कायम राहील, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी व पक्षी निरीक्षक किशोर पाठक यांनी दिली.
ऐतिहासिक बाग...
काँक्रिटीकरणाच्या या जगात ऐतिहासिक वारसा असलेल्या हिमायत बागेने आपले वैभव सध्या तरी कायम ठेवले आहे. या बागेतील ११०.२९ हेक्टर क्षेत्रावर फळबाग संशोधनाचे काम सुरू आहे.
इस्रायल आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने येथे आठ कोटींचा केशर आंबा गुणवत्ता प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत या वर्षी तब्बल आठ हेक्टरवर केशर आंब्याची लागवड केली जाणार आहे. याशिवाय या बागेत चिकू, सीताफळ, बोर, नारळ, कवट, डाळिंब, चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.
मॉर्निंग वॉक करा, पण...
बागेत मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. कुठलाही हस्तक्षेप न करता शांतपणे त्यांनी तो केला तर फळ संशोधनाला गती येईल, अशी आशा हिमायत बागेतील फळसंशोधन केंद्राचे संजय पाटील यांनी व्यक्त केली.
यांना कोण आवरणार?
सोशल मीडियावर अधिकाधिक लाईक मिळविण्यासाठी फोटोग्राफर येथे गठ्ठ्याने मिळतात. पक्षी कुठला याच्याशी फारसे देणे-घेणे नसलेला हा हौसी कलावंत त्याचा पाठलाग करीत कुठपर्यंतही जातो आणि त्याला दमाला आणतो. फळबाग, पक्षी-कीटकांचा कुठलाही विचार त्याला शिवत नाही. जसे रिकामटेकड्या माणसांचे तसेच भटक्या कुत्र्यांचे. या बागेत पावलोगणिक ते भेटतात. मोर हा जास्त उडू न शकणारा पक्षी. चारही बाजूंनी घेरले तर तो सहज सापडतो. हा पक्षी या भटक्या कुत्र्यांचा बळी ठरतो. मोरांची अंडी हे तर त्यांचे आवडीचे खाद्य. माणसांवर पाळत ठेवणे कठीण तिथे या भटक्या कुत्र्यांना कोण आवरणार? अशा रिकामटेकड्या माणसांच्या आणि कुत्र्यांच्या बाजारात कुठला तरी पक्षी-प्राणी कसा जगेल? तेच हिमायत बागेत घडत आहे.