अॅनेमिया चले जाव निश्चय प्रकल्प
By Admin | Updated: July 19, 2014 00:44 IST2014-07-18T23:50:06+5:302014-07-19T00:44:31+5:30
जालना : जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील सर्व विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी, अॅनेमिया (पांढरा कावीळ) निदान व संपूर्ण उपचार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘अॅनेमिया चलेजाव निश्चय’

अॅनेमिया चले जाव निश्चय प्रकल्प
जालना : जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील सर्व विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी, अॅनेमिया (पांढरा कावीळ) निदान व संपूर्ण उपचार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘अॅनेमिया चलेजाव निश्चय’ २४ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती शुक्रवारी संयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जि.प.च्या सभागृहात झालेल्या या पत्रपरिषदेस जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, रोटरी क्लब आॅफ जालना रेनबोच्या अध्यक्षा डॉ. आरती मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.रोटरी क्लब आॅफ जालना रेनबो आणि जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१४ ते २०१६ अशा तीन वर्षात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा व कस्तुरबा गांधी विद्यालयातील मुलींची आरोग्य तपासणी अंतर्गत प्रारंभी आरोग्य प्रबोधन, वैद्यकीयदृष्ट्या माहिती व समुपदेशन करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या ३२ शाळा व कस्तुरबा गांधी ७ शाळांमधील ४५३७ मुलींची हिमोग्लोबीन तपासणी, दंत तपासणी चिकित्सा, मोफत टूथ ब्रश व टूथ पेस्ट वाटप करण्यात येणार आहे. रक्तातील हिमोग्लोबीन तपासणीत अॅनेमिया निदान झालेल्या मुलींवर संपूर्ण मोफत उपचार करण्यात येणार आहे.
सर्व मुलींच्या आहाराचे सर्व्हेक्षण व समुपदेशन, व्यक्तिगत घरातील स्वच्छतागृहे यांचे सर्वेक्षण, स्वच्छतेचे समुपदेशन करण्यात येईल. रोटरी रेनबोचे ७२ सदस्य, जि.प. आरोग्य विभागाचे ३ टेक्नीशिअन, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, शाळेतील शिक्षिका, मुख्याध्यापक व रेनबो रोटरीतील डॉक्टर या सर्वांचा सदरील उपक्रमात सहभाग असणार आहे. यावेळी कृउबा संचालक पंडितराव भुतेकर, शिक्षणााधिकारी राऊत, आरोग्य अधिकारी भटकळ उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनेमिया
शरीरात रक्त कमी किंवा जास्त तयार होणे, रक्त जास्त नष्ट होणे या कारणांमुळे हिमोग्लोबीन तयार होत नाही. त्यामुळे अॅनेमियाचा आजार होण्याची शक्यता असते. नवविवाहित महिलांना शरीरात हिमोग्लोबीन चांगले असेल तर त्या माता बनण्यास सक्षम असतात, असे यावेळी डॉ. आरती मंत्री यांनी सांगितले.
मुलींना आयर्नच्या गोळ्या देण्यात येणार आहेत. मुली गोळ्या खातात किंवा नाही, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी सहमती दर्शविल्याने रोटरी क्लब रेनबोच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.