अन् ती भेट अखेरची ठरली
By Admin | Updated: June 4, 2014 01:36 IST2014-06-04T01:28:16+5:302014-06-04T01:36:07+5:30
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद ‘मी आजपासूनच विधानसभेच्या प्रचारास सुरुवात केली आहे, तुम्हीही तयार व्हा,’ असा आदेश गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद शहरातील कार्यकर्त्यांना तीन दिवसांपूर्वी दिला होता.

अन् ती भेट अखेरची ठरली
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद ‘मी आजपासूनच विधानसभेच्या प्रचारास सुरुवात केली आहे, तुम्हीही तयार व्हा,’ असा आदेश गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद शहरातील कार्यकर्त्यांना तीन दिवसांपूर्वी दिला होता. हा आदेश व शहराची त्यांची ती भेटही अखेरचीच ठरली. केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गोपीनाथ मुंडे दि.३१ मे रोजी पहिल्यांदाच शहरात आले होते. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त चौंडी येथे होणारा कार्यक्रम व त्यानंतर भगवानगडाला भेट देण्यासाठी ते जाणार होते. मूळ कार्यक्रमानुसार ते विमानतळावरूनच हेलिकॉप्टरने चौंडीला जाणार होते; परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले. प्रसन्नता व विलसत्या हास्याने त्यांचा चेहरा अधिकच खुलला होता. मुंडेसाहेब हे हजरजबाबी व चांगले पट्टीचे वक्ते. आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात त्यांनी उपस्थितांना हसविले, काहींना चिमटे काढले व सर्वांना विधानसभा लढविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. तुम्ही तयार व्हा किंवा होऊ नका. मी मात्र आजपासूनच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास लागलो आहे, असे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांच्या बोलण्यात मोठा आत्मविश्वास होता. ग्रामविकासाच्या अनेक कल्पना स्पष्ट करून रोजगार हमी योजनेतील अडचणी सोडविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला होता. साहेब, आम्हाला व्याजासह परत द्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणात म्हणाले होते की, मुंडेसाहेब आपल्या हातून देशाची चांगली सेवा घडो. त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दानवेसाहेब मुंडेसाहेब आम्ही केंद्राला फक्त तीन महिन्यांसाठी उसने दिलेत. तीन महिन्यांनंतर आम्हाला आमचे साहेब व्याजासह परत द्या. त्यांच्या हातून राज्याची सेवा घडणार आहे. राज्याची सेवासुद्धा देशसेवाच आहे. त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता; परंतु काळाने मंगळवारी त्यांच्यावर झडप घालून त्यांना आपल्यातून हिरावून नेले, अशी व्यथा कार्यकर्ते मांडत होते. ४मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादशी गोपीनाथ मुंडे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. औरंगाबादचा त्यांचा पहिला संबंध आला, तो आणीबाणीनंतर १९७५ मध्ये. पुण्यात विधि शाखेत शिकत असताना गोपीनाथ मुंडे यांनी तळेगाव मावळ येथे झालेल्या जनसंघाच्या अधिवेशनात प्रमोद महाजन यांच्यामुळे उपस्थिती लावली. तेथे त्यांची भेट वसंतराव भागवतांशी झाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आणीबाणीला विरोध करण्यासाठी मुंडे, महाजन औरंगाबादेत आले. ‘मराठवाडा’च्या शेजारील सन्मित्र कॉलनीत एक खोली भाड्याने घेऊन ते, प्रमोद महाजन व जयसिंगराव गायकवाड यांच्यासोबत राहू लागले. दिवसभर सायकलवर फिरून माहिती जमा करायची व रात्री त्या माहितीचे सायक्लोस्टाईल पत्रके तयार करून मोठमोठ्या अधिकार्यांच्या घरासमोर ती पत्रके ते गुपचूप टाकत. पोलिसांनी त्यांना अटक केली व हर्सूल जेलमध्ये टाकले.