...अन् नवरदेवाने ठोकली धूम
By Admin | Updated: March 18, 2016 00:20 IST2016-03-18T00:20:50+5:302016-03-18T00:20:50+5:30
औरंगाबाद : मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला... पसंती झाली. सुपारी फुटली, साखरपुडा झाला, लग्नाची तारीखही ठरली,

...अन् नवरदेवाने ठोकली धूम
औरंगाबाद : मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला... पसंती झाली. सुपारी फुटली, साखरपुडा झाला, लग्नाची तारीखही ठरली, मुलीकडील पत्रिका छापून त्या वाटल्याही अन् लग्नाची तारीख जवळ येताच अचानक नवरदेव घरातून गायब झाला. हे समजताच मुलीकडील लोकांना धक्काच बसला. शेवटी मुलीने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून नवरदेव तरुणासह त्याच्या घरच्यांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली... दुसऱ्या मुलीसोबत त्या नवरदेवाचे प्रेम प्रकरण होते, त्यामुळे ऐनवेळी लग्नास नकार देऊन हा नवरदेव पळून गेल्याचे स्पष्ट झाले.
मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये नवरदेव सुशील झांबरे, त्याचे वडील देवीदास झांबरे व आई (रा. संभाजी कॉलनी, सिडको एन- ६) यांच्यासह लग्न जमविणारी सुशीलची बहीण, त्याचे मामा लक्ष्मण (रा. औरंगपुरा, चुनाभट्टी) यांचा समावेश आहे. या घटनेबाबत माहिती देताना फौजदार हारुण शेख यांनी सांगितले की, फिर्यादी २५ वर्षीय तरुणीही मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील शिवशाहीनगरातील रहिवासी आहे. या मुलीच्या घरचे गेल्या काही महिन्यांपासून मुलीसाठी स्थळ शोधत होते. नातेवाईकांनी त्यांना सुशीलचे स्थळ आणले. जानेवारी महिन्यात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. सुशील आणि त्याच्या घरच्यांनी मुलगी पाहिल्यानंतर लागलीच होकार कळविला. मग पुढच्या बोलाचाली सुरू झाल्या. मान-पान देण्याचे ठरले. ९ फेब्रुवारी रोजी मुलीच्या घरी थाटामाटात साखरपुडाही पार पडला.
मग लग्नासाठी १३ मार्च तारीख काढण्यात आली. मुलीकडच्या मंडळींनी लग्नासाठी जोरदार तयारी सुरू केली. लग्नाच्या चार दिवस अगोदर मुलीकडची मंडळी मुलाच्या घरी कशी तयारी चालू आहे हे पाहण्यासाठी गेली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. नवरदेव मुलगा घरातून गायब होता. ‘त्याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण आहे. त्याने आम्हाला आताच सांगितले. तो लग्नास तयार नाही, त्याच मुलीसोबत लग्न करायचे म्हणत घरातून पळून गेला’ असे मुलाच्या घरच्यांनी मुलीच्या नातेवाईकांना सांगितले.
सरळ हात वर
मुलगा आमचे ऐकत नाही. तो लग्नास तयार नाही. त्याचे प्रकरण आम्हाला आधी माहीत नव्हते, आता हे लग्न होऊ शकत नाही, असे म्हणत मुलाच्या घरच्यांनी ऐन लग्नाच्या चार दिवस अगोदर हात वर केले आणि लग्न मोडले. या प्रकाराने हैराण झालेल्या मुलीच्या घरच्यांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु काहीही उपयोग झाला नाही. शेवटी मुलीने आपली फसवणूक करणाऱ्या या मुलाला व त्याच्या घरच्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आणि तिने बुधवारी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले व मुलगा सुशीलसह त्याचे आई- वडील, बहीण व मामाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. फौजदार शेख हारुण या प्रकरणाचा तपास करीत आहेत.