पाच महिने अगोदर मिळणार पीक विम्याची रक्कम
By Admin | Updated: December 10, 2014 00:40 IST2014-12-10T00:38:04+5:302014-12-10T00:40:11+5:30
उस्मानाबाद : राज्यातील खरीप हंगामातील काही पिकांचा कापणी प्रयोग पूर्ण झाला आहे. या प्रयोगाची उपलब्ध माहिती एकत्रित करुन ती लवकरच पीक विमा कंपनीकडे सुपूर्द केली जाणार आहे.

पाच महिने अगोदर मिळणार पीक विम्याची रक्कम
उस्मानाबाद : राज्यातील खरीप हंगामातील काही पिकांचा कापणी प्रयोग पूर्ण झाला आहे. या प्रयोगाची उपलब्ध माहिती एकत्रित करुन ती लवकरच पीक विमा कंपनीकडे सुपूर्द केली जाणार आहे. मागील अनेक वर्षाप्रमाणे जून-जुलैमध्ये खरीप पिकाच्या विम्याची रक्कम मिळत होती. मात्र यावर्षी पाच महिने अगोदर म्हणजे जानेवारीमध्येच उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी कळविले आहे.
औरंगाबाद येथे २७ नोव्हेंबर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील आमदारांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या समवेत मराठवाड्यातील इतर आमदारांनी अंतिम पैसेवारीची वाट न पाहता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांनी उतरविलेल्या पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी जूनची वाट पाहावी लागू नये, अशी मागणी केली होती.
दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच कृषिआयुक्त दांगट यांना पीक विमा लवकरात लवकर मिळावा, यासाठीची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याने यंदा पाच महिने अगोदर विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता असल्याचे बिराजदार यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी १४.९३ कोटी रक्कम विमा कंपनीकडे भरली असून, पीक कापणी प्रयोगातून काढलेल्या उंबरठा उत्पादनात झालेली घट लक्षात घेता जिल्ह्याला जवळपास २०० कोटी रक्कम मिळण्याची शक्यता असल्याचेही बिराजदार यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)