पोलिसांच्या वाहनांवरील अंबर दिवे कायम
By Admin | Updated: August 21, 2014 01:20 IST2014-08-21T01:09:04+5:302014-08-21T01:20:37+5:30
अमित सोमवंशी, उस्मानाबाद अतिमहत्त्वाच्या, महत्त्वाच्या व्यक्ती, अधिकारी यांना लाल, अंबर दिवा किंवा फ्लॅशरसंदर्भात गृहविभागाने १० डिसेंबर २०१३ रोजी धोरण स्पष्ट केले होते

पोलिसांच्या वाहनांवरील अंबर दिवे कायम
अमित सोमवंशी, उस्मानाबाद
अतिमहत्त्वाच्या, महत्त्वाच्या व्यक्ती, अधिकारी यांना लाल, अंबर दिवा किंवा फ्लॅशरसंदर्भात गृहविभागाने १० डिसेंबर २०१३ रोजी धोरण स्पष्ट केले होते. परंतु, यात पुन्हा बदल करुन नवा अध्यादेश काढण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार फक्त राज्यातील नऊ अतिमहत्वाच्या व्यक्तींना लाल दिवा व फ्लॅशर दिला आहे. यात महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश, विधानपरिषदेचे सभापती, अध्यक्ष व विधान मंडळांचे विरोधी पक्षनेता आणि मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याच वाहनांच्या टप्प्यावर लाल दिवा असणार आहे.या आदेशाच्या अनुषंगाने येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संबंधितांना सूचनाही दिल्या होत्या.
यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीचे अंबर दिवे काढून निळे दिवे बसवून नियमाची अंमलबजावणी केली. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस विभागाने मात्र, हे नियम धाब्यावर बसवित गाडीवरील अंबर दिवे अद्यापही कायम असून, यावर परिवहन कार्यालयाकडूनही कारवाई झाल्याचे दिसत नाही.
लाल दिवा, अंबर दिवा आणि निळ्या दिव्यांच्या संदर्भात राज्याच्या गृहविभागाने धोरण स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही वाहनावरील दिव्याच्या वापरासंबधी कठोर निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी नियमानुसार दिवे बदलले आहेत. पोलिस प्रशासनानेही त्यांच्या वाहनांवरील अंबर दिवे काढून निळे दिवे बसविणे गरजेचे आहे. परंतु, पोलिस दलातील वाहनांवरील अंबर दिवे अद्यापही कायम आहेत.