सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेदरम्यान बाजारपेठ उघडण्याची परवानगी द्या; जिल्हा व्यापारी महासंघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:49 IST2021-05-18T11:49:13+5:302021-05-18T11:49:26+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळून बंद आहे. परिणामी, लहान मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.

सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेदरम्यान बाजारपेठ उघडण्याची परवानगी द्या; जिल्हा व्यापारी महासंघाची मागणी
औरंगाबाद : व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेदरम्यान संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली.
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळून बंद आहे. परिणामी, लहान मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीची दुरुस्तीची कामे करण्यासाठी ४ दिवसांसाठी तात्काळ परवानगी द्यावी, व्यापाऱ्यांना शासनाकडून विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, बंदच्या काळातील वीज बिलावर सवलत देण्यात यावी, मालमत्ता करामध्ये सूट देण्यात यावी आणि ३१ मार्च २०२२ पर्यंत कोणत्याही प्रकारचे व्याज व दंड वसूल करण्यात येऊ नये, बँकांकडून व खाजगी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाची हप्त्यांची व व्याजाची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, या मागण्याही करण्यात आल्या. निवेदन देताना अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, तनसुख झांबड, विनोद लोया यांची उपस्थिती होती. निवेदनाचा सकारात्मक विचार करून लवकरच संपूर्ण बाजारपेठ सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परवानगी देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे व्यापारी महासंघाने सांगितले.