मर्जीतील लोकांनाच साहित्याचे वाटप
By Admin | Updated: July 9, 2014 00:09 IST2014-07-08T23:33:52+5:302014-07-09T00:09:07+5:30
पाथरी : कृषी विभागामार्फत मानव विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या स्प्रींकलर आणि इंजिनचे साहित्य मर्र्जीतील लोकांना वाटप करण्यात आले आहे.

मर्जीतील लोकांनाच साहित्याचे वाटप
पाथरी : कृषी विभागामार्फत मानव विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या स्प्रींकलर आणि इंजिनचे साहित्य मर्र्जीतील लोकांना वाटप करण्यात आले आहे. तसेच गतवर्षी खत आणि औषधाचे वाटपही मनमानीपणे करण्यात आल्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले आणि या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.
राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप केले जाते. मानव विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना यावर्षी स्प्रींकलर आणि इंजिनचे वाटप करण्यात आले. मर्जीतील लोकांचे प्रस्ताव मागून घेऊन कृषी विभागााच्या अधिकाऱ्यांनी हे साहित्य वाटप केले आहे. अनेक शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नाही. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभ झाला नाही. गतवर्षी या तालुक्यासाठी उपलब्ध झालेला खत आणि औषधाचा पुरवठाही वाटप करताना कोणतेही निकष पाळले नाहीत. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी कृषी विभागाच्या या कारभाराच्या विरोधात नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
५ जुलै रोजी पं. स. ची मासिक सभा झाली. या सभेमध्ये पंचायत समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी काकडे यांच्या कारभाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त करीत कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. काही संतप्त सदस्यांनी कृषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली. (वार्ताहर)
कृषी विभागाचा मनमानी कारभार
कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना दलालामार्फतच राबविल्या जातात. वैयक्तिक शेतकरी योजनेची माहिती घेण्यासाठी कार्यालयात आले तर कर्मचाऱ्यांकडून माहिती वेळेवर दिल्या जात नाही. दलालांकडून येणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र योजनेचा निश्चित लाभ मिळतो. कृषी विभागाच्या या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत.
२८ पिंक्लर सेटचे वाटप
मानव विकास कार्यक्रमांतर्गत कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मंडळाच्या गटास २८ स्प्रींकलर आणि इंजिनचे वाटप करण्यात आले असले तरी मर्जीतील कर्मचाऱ्यांनाच या साहित्याचे वाटप झाल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.
या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.