६९ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप
By Admin | Updated: June 22, 2014 00:25 IST2014-06-22T00:08:49+5:302014-06-22T00:25:52+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील २१ हजार ६७१ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६८ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांचे पीककर्ज खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आले आहे.

६९ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना वाटप
हिंगोली : जिल्ह्यातील २१ हजार ६७१ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६८ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांचे पीककर्ज खरीप हंगामासाठी वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने दरवर्षी पीककर्ज वाटप करण्यात येते. २०१४-१५ या वर्षासाठी खरीप हंगामाकरीता जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेला सप्टेंबरपर्यंत ५३२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मे पासून आतापर्यंत जिल्ह्यातील २१ हजार ६७१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या वतीने १६ हजार ४४४ हेक्टर जमिनीवरील १५ हजार १२६ शेतकऱ्यांच्या पिकांसाठी २२ कोटी ३ लाख ८० हजार रुपयांचे तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेच्या वतीने ३ हजार ३०५ शेतकऱ्यांना २७ कोटी ७१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने ३ हजार २४० शेतकऱ्यांना १९ कोटी २३ लाख ४२ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. पीककर्ज वाटपाची ही सरासरी १२.९६ ही टक्केवारी असून, सप्टेंबर महिन्यापर्यंत खरीप हंगामासाठीचे कर्ज वाटप उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची काही दिवसापूर्वी बैठकही घेतली होती.
रब्बीसाठी १३३ कोटींचे उद्दिष्ट
रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना एकूण १३३ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेला ३१ कोटी २० लाख रुपये, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेला ८९ कोटी ४० लाख रुपये आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १२ कोटी ४० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाचे कर्ज वाटप सुरू होते. (जिल्हा प्रतिनिधी)
काही बँकांकडून कर्ज वाटपास टाळाटाळ
जिल्ह्यातील काही बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत; परंतु शासनाने सर्व बँकांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे पीककर्ज वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. एखादी बँक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यास याबाबतची तक्रार संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येते.