‘अलाहाबाद’ च्या पदव्या फेटाळल्या !
By Admin | Updated: May 21, 2014 00:16 IST2014-05-20T23:57:21+5:302014-05-21T00:16:47+5:30
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये सध्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि बदल्यांची धामधूम सुरु आहे.

‘अलाहाबाद’ च्या पदव्या फेटाळल्या !
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये सध्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि बदल्यांची धामधूम सुरु आहे. प्राथमिक शिक्षक या पदावर प्राथमिक पदवीधर होण्यासाठी ‘बीएड’ धारक असणे बंधनकारक आहे. ‘झट पदवी, पट पदोन्नती’ असे म्हणत जिल्हाभरातील १५० शिक्षकांनी अलाहाबाद हिंदी विद्यापीठाची (प्रयाग) बीएड पदवी घेतली आहे. मात्र हे पदवीधारक पदोन्नतीसाठी पात्र ठरत नसल्याचा प्रकार समोर असल्यानंतर जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी संबंधित शिक्षकांना प्राथमिक पदवीधर म्हणून पदोन्नती देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. हा एक प्रकारे ‘अलाहाबाद’ पदवीधारकांना झटका मानला जात आहे. एखाद्या प्राथमिक शिक्षकाला बीएड ही पदवी धारण करावयाची असेल तर संबंधित गुरुजीला बीएड कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन नियमित अभ्यासक्रम पूर्ण करुन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, अलाहाबाद हिंदी विद्यापीठाची बीएडची पदवी घेण्यासाठी कुठल्या कॉलेजात अथवा कुठल्या विद्यापीठात जाण्याची गरज भासत नाही. घरबसल्या परीक्षा देऊन ही पदवी मिळविता येते. हे कळाल्यानंतर गुरूजींचा सदरील विद्यापीठाची बीएडची पदवी घेण्याकडे कल वाढला. कालांतराने या विद्यापीठाची पदवी घेण्यासाठी गुरुजींच्या अक्षरश: उड्या पडल्या. थोड्या थोडके नव्हे तर शेकडो गुरुजींनी येथून बीएडची पदवी मिळविली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह््यातील ७ गुरुजींना या विद्यापीठातील पदवीचा आधारावरच पदोन्नत्यादेखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विद्यापीठाची पदवी घेणार्या शिक्षकांच्या संख्येत वाढ झाल्याचे समजते. आजघडीला जिल्हाभरातील तब्बल १५० वर गुरुजी ‘अलाहाबाद’चे पदवीधारक आहेत. यापैकी पात्र असलेल्या गुरुजींनी पदोन्नतीसाठी शिक्षण विभागाकडे अर्ज केल्यानंतर संबंधित यंत्रणा चांगलीच पेचात सापडली होती. दरम्यान, हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी शासनाचे यासंबंधित असलेले निर्णय तपासून त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाचे पदवीधारक शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र ठरणार नाहीत, असा निष्कर्ष नोंदविला आहे. गतवर्षी ज्या निकषावर सात शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. त्याच निकषावर यंदाही अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतलेल्या शिक्षकांना पदोन्नती द्यावी, अशी मागणी मागी काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने केली जात असल्याचे राज्य उपाध्यक्ष बशीर तांबोळी यांनी सांगितले. यासाठी यापुढेही शासनस्तरावर पाठपुरावा सुरु ठेवणात येईल, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी ए.एस. उकिरडे यांच्याकडे याबाबतीत विचारणा केली असता, ते म्हणाले की, अलाहाबाद हिंदी विद्यापीठातून बीएड पदवी घेतलेल्या गुरुजी पदोन्नतीस पात्र ठरतात की नाही, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्यांसमवेत चर्चा झाली. सर्व शासन निर्णय तपासले असता, सीईओंनी अशा पदवीधारकांना पदोन्नती देता येत नाही, असे स्पष्ट केले आहे. अलाहाबाद हिंदी विद्यापीठातून बीएड पदवी धारण केलेल्या ७ जणांना गतवर्षी प्राथमिक पदवीधर या पदावर पदोन्नती देण्यात आली होती. या गुरुजींनाही आता मूळ पदावर (रिव्हर्शन) आणण्याचे निर्देश सीईओ रावत यांनी शिक्षणाधिकार्यांना दिले आहेत.