बायपासवरचे तिन्ही पूल म्हणजे वाहतुकीचा गोंधळ अन् दलदल...
By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:06 IST2023-07-15T19:05:42+5:302023-07-15T19:06:19+5:30
पाऊस पडल्याने रस्ते निसरडे बनत असल्याने वाहने घसरून पडत आहेत.

बायपासवरचे तिन्ही पूल म्हणजे वाहतुकीचा गोंधळ अन् दलदल...
छत्रपती संभाजीनगर : बायपासवर देवळाई, संग्रामनगर, एमआयटी अशा तीन उड्डाणपुलांची निर्मिती करून मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला; परंतु पावसाळ्यात तिन्ही पुलांजवळ दलदल झाली असून वाहतुकीचा गोंधळ उडाला आहे.
सध्या पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी लोखंडी जाळ्या, रस्त्यावर दिवे लावण्याचे काम सुरू आहे. पुलाच्या खाली खोदकाम, रस्ता सुरळीत करणे आणि पावसाच्या पाण्याला वाट काढून देण्याचे काम सुरू आहे; परंतु पाऊस पडल्याने रस्ते निसरडे बनत असल्याने वाहने घसरून पडत आहेत. सध्या शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पुढे जोरदार पावसात मोठ्या अडचणी येऊ शकतात. सा. बां. विभागाने रस्त्यातील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी पालकवर्ग, तसेच नागरिकांतून होत आहे. अनेकांना पुलावरून जाता येत नाही. परिसरातील रहिवाशांना जास्त अडचणींना सामोरे जावे लागते. पुलाखालील रस्ता मोकळा करावा, अशी त्यांची मागणी आहे.