समांतरला सर्व पक्षांचा विरोध

By Admin | Updated: December 23, 2014 00:26 IST2014-12-23T00:26:11+5:302014-12-23T00:26:11+5:30

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेतलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला शिवसेना वगळता आज सर्व पक्षांनी विरोध केला.

All sides opposed to parallel | समांतरला सर्व पक्षांचा विरोध

समांतरला सर्व पक्षांचा विरोध


औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेतलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला शिवसेना वगळता आज सर्व पक्षांनी विरोध केला. विशेषत: सेनेसोबत सत्तेत असल्याने भाजपाने विरोध करून वेगळी राजकीय चूल मांडल्याचे दाखवून दिले. पाणीपुरवठा, पाणीपट्टी वसुलीसाठी येणारे गुंड, रखडलेल्या रस्त्यांची कामे, विकासकामांना लागलेली कात्री या विषयांवर सोमवारच्या सभेत नगरसेवकांना बोलायचे होते. मात्र, महापौरांनी चर्चेपूर्वीच सभा गुंडाळून टाकल्यामुळे नगरसेवकांचा संताप झाला.
२० डिसेंबरची तहकूब सभा १२ वा. सुरू झाली. सभेच्या सुरुवातीलाच आयुक्त पी. एम. महाजन यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. २० रोजी आयुक्तांना नगरसेविकांनी बांगड्यांचा अहेर दिल्यामुळे ते सभेला आले नव्हते.
शहरात असताना आयुक्त सभेला का आले नाही, असा सवाल सदस्य राजू वैद्य, मधुकर सावंत, प्रमोद राठोड, समीर राजूरकर, मिलिंद दाभाडे, रेखा जैस्वाल, सत्यभामा शिंदे, गजानन बारवाल, संजय केणेकर, राजू शिंदे यांनी केला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार होता. सदस्यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न के ल्याने महापौरांनी सभा तहकूब केली.
आयुक्तांना विनवण्या....
आयुक्तांना सर्व पदाधिकाऱ्यांनी फोनवर फोन करून सभेला येण्यासाठी अक्षरश: विनवण्या केल्या. शहरात असतानाही आयुक्त सभेला आले नव्हते. त्यामुळे सर्वांनी राग व्यक्त करीत महापौर, उपमहापौर, सभागृह नेत्यांना घेरले. सदस्य राजूरकर म्हणाले, सभागृहात टाईमपास करण्यासाठी कुणीही आलेले नाही. विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड म्हणाले, सभा घ्यायची नसेल तर तातडीने सांगा, विरोधक बहिष्कार टाकून निघून जातील. तासाभरानंतर आयुक्त सभागृहात आले. सर्वांची कामे होतील. भेदभाव करणार नाही. जास्तीचा निधी आणून काम करू, असे उत्तर आयुक्तांनी दिले. त्यामुळे सदस्य संतापले. ४
भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथ कोकाटे यांना महापौरपदावर बसवून सभा चालविण्यासाठी निमंत्रित करताच सेवकाने राजदंड पळवून नेत तो सभागृहातील चेंबरमध्ये ठेवून दिला.
४महापौरांनी राष्ट्रगीत न घेताच सभा संपविल्यामुळे सभा तहकूब आहे की संपली आहे, याचे स्पष्टीकरण नगरसेवकांना मिळालेले नव्हते. त्यामुळे कोकाटे यांना औटघटकेचे महापौर करण्यात येणार होते. सभागृहात राजदंड पळवून नेण्याचा प्रकार अतिशय विनोदी वातावरणात पार पडला.
सदस्य काशीनाथ कोकाटे म्हणाले, सिटी वॉटर युटिलिटी कंपनी सुविधा देत नाही. महापौर चर्चेस तयार होत्या, मात्र त्यांच्यावर दबाव आल्यामुळे चर्चा होऊ दिली नाही. गुंड वृत्तीचे एजंट वसुलीसाठी नागरिकांकडे येत आहेत. यावर प्रशासनाकडून खुलासा अपेक्षित होता.
देसरडा म्हणाले, वॉटर बायलॉज चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे. राजूरकर म्हणाले, ठराव घेताना विचारले जात नाही. मंजुरीच्या वेळेस विचारले नाही. नगरसेवक, नागरिकांनी समांतरने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील. प्रमोद राठोड म्हणाले, सेनेला समांतरवर बोलू देऊ वाटत नाही.
सेनेचे नेते, पदाधिकारी समांतरचा विषय निघताच सभेला वेगळे वळण देतात. अनिल मकरिये म्हणाले, औरंगपुऱ्यात दूषित पाणीपुरवठा होतो आहे. समांतरचे कंत्राट मनपाने रद्द केले पाहिजे. राजू शिंदे म्हणाले, शहरातील सर्वच कामे ठप्प पडली आहेत, समांतरला दिले जाणारे ५.५ कोटी रुपये बिल थांबवावे.

Web Title: All sides opposed to parallel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.