मद्यपि शिक्षकाने शाळेच्या चाव्या कार्यालयात भिरकावल्या
By Admin | Updated: June 27, 2014 00:11 IST2014-06-26T23:20:59+5:302014-06-27T00:11:36+5:30
निलंगा : जि़प़प्राथमिक शाळा कांबळेवाडीच्या शाळेत शिक्षकाने शाळा वाऱ्यावर सोडून बेजबाबदारपणे शाळेच्या चाव्या कार्यालयात फेकून गेल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे़

मद्यपि शिक्षकाने शाळेच्या चाव्या कार्यालयात भिरकावल्या
निलंगा : तालुक्यातील मदनसुरी केंद्रातील जि़प़प्राथमिक शाळा कांबळेवाडीच्या शाळेत शिक्षकाने शाळा वाऱ्यावर सोडून बेजबाबदारपणे शाळेच्या चाव्या कार्यालयात फेकून गेल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे़
मदनसुरी केंद्रांतर्गत कांबळेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे ७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ यामध्ये दोन शिक्षकांची पदे मान्य असून, एक पद मात्र अद्यापही रिक्त आहे़ याठिकाणी टी़वाय़ म्हैत्रे कार्यरत आहेत़ परंतु, ते दररोजच गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीविना शाळा भरवावी लागत आहे़ याबाबत निलंगा पं़स़चे गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी तक्रार केली असता त्यांनी गेल्या तीन दिवसापूर्वी शाळेला भेट दिली़ त्यावेळीही म्हैत्रे उपस्थित नव्हते़
झालेल्या प्रकाराची पाहणी करून गट शिक्षण अधिकारी जीवनराव ढगे हे परत गेले़ परंतु, पुन्हा २३ जून रोजी या शिक्षकाने शाळा वाऱ्यावर सोडून शहरात भटकत असल्याचे दिसून आले़ याबाबत मदनसुरी केंद्र प्रमुख टी़डीक़वाळे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही निलंगा येथे केंद्र संमेलनात होतो़ त्यावेळी म्हैत्रे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी आमच्यापासून पळ काढल्याचे कवाळे म्हणाले़ यासंबंधीचा अहवाल मंगळवारी गटविकास अधिकाऱ्याला पाठविल्याचेही त्यांनी सांगितले़ (वार्ताहर)
नवीन शिक्षक देणाऱ़़
मदनसुरी केंद्रातील कांबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत झालेल्या प्रकारामुळे या शाळेसाठी नवीन शिक्षक समायोजनेतून देणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी जीवनराव ढगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़