विमानतळ निदेशक वार्ष्णेय हर्सूल कारागृहात
By Admin | Updated: August 4, 2016 00:38 IST2016-08-04T00:35:02+5:302016-08-04T00:38:22+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानतळ निदेशक अलोक वार्ष्णेय याचा जामीन अर्ज अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी फेटाळला.

विमानतळ निदेशक वार्ष्णेय हर्सूल कारागृहात
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानतळ निदेशक अलोक वार्ष्णेय याचा जामीन अर्ज अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी फेटाळला. वार्ष्णेयची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान १० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने निलंबित केले असल्याची माहिती बचाव पक्षाने न्यायालयास दिली.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानतळ प्राधिकरणाचे निदेशक अलोक वार्ष्णेय यांनी ३० जुलै रोजी मालाड येथील खासगी कंपनीच्या व्यक्तीकडून १० हजारांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने अटक केली होती. न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याच्या कार्यालयातील कागदपत्र हस्तगत करावयाचे आहे असा युक्तिवाद सीबीआयचे वकील डी. एन. म्हस्के यांनी केला, तर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. नीता बागवे यांनी सर्व कागदपत्र हस्तगत करण्यात आले असून पोलीस कोठडीची गरज नसल्याची बाजू मांडली.
अॅड. नीता बागवे यांनी तातडीने जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी तो जामीन अर्ज फेटाळला. त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वार्ष्णेयला निलंबित केल्याची माहिती न्यायालयात दिली.