'ऐ मेरी जमी...'; पाकिस्तानमधून परतलेल्या हसीना बेगम यांनी मातृभूमीत घेतला अखेरचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:48 IST2021-02-09T17:47:31+5:302021-02-09T17:48:10+5:30
Hasina Begum, returning from Pakistan, breathed her last in her homeland पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादमधील हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले.

'ऐ मेरी जमी...'; पाकिस्तानमधून परतलेल्या हसीना बेगम यांनी मातृभूमीत घेतला अखेरचा श्वास
औरंगाबाद : पासपोर्ट हरवल्याने पाकिस्तानमध्ये तब्बल १८ वर्ष काढलेल्या हसीना बेगम या २६ जानेवारील त्यांच्या जन्मगावी औरंगाबाद येथे परतल्या. मात्र, मातृभूमीत परत आल्यानंतर केवळ १५ दिवसांमध्ये त्यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. वारस नसल्याने शहरातील त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर औरंगाबाद येथे अंत्यविधी केले.
पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादमधील हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले. औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तान न्यायालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची सुटका झाली आणि प्रजासत्ताक दिनी हसीना बेगम औरंगाबाद येथे परतल्या होत्या. मातृभूमीत परतताच त्यांनी स्वर्गात आल्यासारखे वाटत आहे, येथे शांततेची जाणीव होते अशी प्रतिक्रिया दिली होती. औरंगाबाद येथे ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती या नातेवाईकाकडे त्या राहत होत्या. या दरम्यान, त्यांच्या नावे असलेली जमीन हडप झाल्याची घटना उघडकीस आली होती. या विरोधात लढा देण्याची तयारी सुद्धा त्यांनी केली होती. मात्र, मातृभूमीत परत आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांमध्ये त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
औरंगाबादमधील रशिदपुरा येथील मूळ वास्तव
हसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदपुरा परिसरातील आहेत. त्यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. १८ वर्षांपूर्वी त्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासही पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान, त्यांचा पासपोर्ट लाहोर येथे हरवला. यामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये कैद करण्यात आले. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली. हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.
येथे शांततेची जाणीव होते
पाकिस्तानातील अनुभवाबाबत हसिना बेगम यांनी सांगितले की, मी अत्यंत बिकट परिस्थितीत होते. या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या मदतीबाबत मी खूप आभारी आहे. मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या.