अहमदपुरात वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: May 13, 2014 01:08 IST2014-05-12T23:47:20+5:302014-05-13T01:08:01+5:30
अहमदपूर : अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूने शिवाजी चौक, सावरकर चौक, आंबेडकर चौक, बसवेश्वर चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले

अहमदपुरात वाहतुकीची कोंडी
अहमदपूर : अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूने शिवाजी चौक, सावरकर चौक, आंबेडकर चौक, बसवेश्वर चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असल्याने शहरात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. साधारणपणे एक वर्षापूर्वी नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले होते. त्यानंतर तेथे काही दिवस अतिक्रमण करु दिले गेले नाही. मात्र मागच्या काही महिन्यापासून अतिक्रमणधारकांनी पुन्हा आपल्या पूर्वीच्याच जागी हळूहळू अतिक्रमण करणे सुरू केल्याने आजघडीला शहरात प्रचंड अतिक्रमण वाढले आहे. बसस्थानकासमोरील लातूर-नांदेड रोड, अंबाजोगाई रोड, थोडगा रोड तसेच शहरातील काही इतर रस्त्यांच्या दोन्ही बाजूने अनेकाने पत्र्याचे, लाकडाचे शेड मारुन अतिक्रमण केले आहे. तर अनेकांनी या रस्त्याच्या बाजूला चहा, पानसुपारीच्या टपर्या उभ्या केल्या आहेत. अनेकांनी या ठिकाणी छोटे-मोठे विविध व्यवसाय सुरू करून अतिक्रमण केले आहे. शिवाजी चौक, सावरकर चौक, आझाद चौक हे चौक तर हातगाडेवाल्यांनी भरून गेले आहेत. या चौकात भाजीपाला, विविध प्रकारचे फळे असलेले हातगाडे मोठ्या प्रमाणात उभे केले जातात. त्यामुळे पादचार्यांना व वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. लातूर-नांदेड रोड तर अतिक्रमणानी फुलून गेला असल्याने या रोडवर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. बसवेश्वर चौक ते सावरकर चौक दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन वाहनाच्या रांगाच्या रांगा नेहमीच दिसून येतात, असे असतानाही नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. सा.बां. विभाग व न.पा. प्रशासन यांनी आपापल्या जागेतील अतिक्रमण काढले तर वाहतुकीची होणारी कोंडी कमी होऊ शकते. वाहतुकीची कोंडी दूर करू शहरात सध्या नांदेड-लातूर मार्गावर दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम सुरू आहे. त्याचे साहित्य रस्त्यावर पडल्याने भाजीपाला विक्रेते रस्त्यावर आले आहेत. परिणामी खरेदीसाठी आलेल्या मोटारसायकल धारकांनाही वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतुकीच्या कोंडीबाबत सा.बां. विभागाला पत्र दिले आहे, त्यामुळे सदरील नालीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर थांबणार्या वाहनधारकांवर कारवाई करून वाहतुकीची कोंडी दूर करू, अशी प्रतिक्रिया अहमदपूरचे पोलीस निरीक्षक सोपान मोरे यांंनी लोकमतशी बोलताना दिली. (वार्ताहर)