कृषी विभागाचे वरातीमागून घोडे !

By Admin | Updated: July 23, 2014 00:41 IST2014-07-23T00:24:01+5:302014-07-23T00:41:03+5:30

सय्यद लाल , बाजारसावंगी मका, कापूस पिकांची लागवड पहिल्या आठवड्यापर्यंत करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना देणारा कृषी विभाग मात्र बियाणांचे वाटप पेरणीनंतर म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात करीत आहे.

Agriculture Department's horse-riding horse! | कृषी विभागाचे वरातीमागून घोडे !

कृषी विभागाचे वरातीमागून घोडे !

सय्यद लाल , बाजारसावंगी
मका, कापूस पिकांची लागवड जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना देणारा कृषी विभाग मात्र बियाणांचे वाटप पेरणीनंतर म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात करीत असल्याने हे बियाणे वाटप म्हणजे कृषी विभागाचे वरातीमागून घोडे हाकणे असल्याची प्रतिक्रिया खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सध्या कृषी विभागातर्फे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मका वाणाचे व इतर वस्तू प्रती बॅग ६५० रुपयांत अनुदानाच्या नावावर वितरण केले जात आहे. बाजारसावंगी, लोणी, बोडखा, गंधेश्वर, दरेगाव, पाडळी, सोबलगाव, कनकशीळ, वडोद, सुलतानपूर, येसगाव, ताजनापूर, जानेफळ, ममुराबाद, शिरोडी परिसरातील शेतकऱ्यांनी जून महिन्यातच मका लागवड केली, तर उर्वरित काही शेतकऱ्यांनी जूनचा शेवट ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी उरकली.
रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे बहुसंख्य ठिकाणी कमी अधिक प्रमाणात उगवण झाली, तर काही शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या, तर काहींनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात दुबार पेरणी उरकली.
कृषी विभागातर्फे नेहमीच शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर वाटप होणाऱ्या वस्तू वेळ टाळून वाटप केले जात असल्याने शेतकऱ्यांना या वस्तू डोईजड ठरतात. पेरणी होऊन उगवण झाल्यानंतर सध्या कृषी विभागातर्फे उशिराने मका बियाणे, औषधीचे वाटप केले जात असल्याने आता या बियाणांचे करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात बियाणांचे वाटप केले गेले असते, तर या बियाणे व औषधीचा शेतकऱ्यांना नक्कीच हातभार लागला असता, अशी प्रतिक्रिया येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र नलावडे, कचरू नलावडे यांनी व्यक्त केली.
पेरणी यंत्र वाटपातही घोळ
कृषी विभागातर्फे ट्रॅक्टर मालक असलेल्या शेतकऱ्यांना पेरणी यंत्र घेण्यासाठी डिमांड ड्राफ्ट घेण्यात आले; मात्र मर्जीतील शेतकरी, नातेवाईक व चिरीमिरी देणाऱ्या लाभार्थ्यांनाच पेरणी यंत्र मिळाले, इतर मात्र अजूनही प्रतीक्षेत आहेत. पेरणी झाल्यानंतरही पेरणी यंत्राची प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबत कृषी सहायकांशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Agriculture Department's horse-riding horse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.