एजंट-गुंतवणूकदार हातापायी

By Admin | Updated: July 19, 2014 00:43 IST2014-07-18T23:45:32+5:302014-07-19T00:43:36+5:30

अंबड : केबीसी कंपनीच्या घोटाळ्याची तालुक्यातील व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनी बुडाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तालुक्यात ठिकठिकाणी गुंतवणूकदार व एजटांमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.

Agent-Investor Hand Held | एजंट-गुंतवणूकदार हातापायी

एजंट-गुंतवणूकदार हातापायी

अंबड : केबीसी कंपनीच्या घोटाळ्याची तालुक्यातील व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनी बुडाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तालुक्यात ठिकठिकाणी गुंतवणूकदार व एजटांमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.
अद्यापपर्यंत या मारहाणीच्या प्रकाराबद्दल कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार केली नसली तरी संतप्त गुंतवणुकदारांकडुन अनुचित प्रकार घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कंपनीचे तालुक्यातील बहुतांश एजंट फरार झाले असून अनेक चिंताग्रस्त गुंतवणूकदारांनी अंथरुण पकडले आहे. एकंदर कंपनीच्या घोटाळ्यामुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले असून याप्रकरणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. केबीसी घोटाळयाची तालुक्यातील व्याप्ती सुमारे १०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. याप्रकरणी विविध सामाजिक संघटनाही सक्रिय झाल्या असून संभाजी ब्रिगेडच्यावतीने अंबड व घनसावंगी तालुक्यातील गुंतवणूकदारांचा मेळावा घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष संतोष जेधे यांनी केली आहे.
केवळ तीस महिन्यात सहापट रक्कम मिळवून देण्याचा दावा करत सुमारे चार वर्षापूर्वी केबीसी कंपनी तालुक्यात अवतरली. कंपनीने सुरुवातीच्या काळात अनेकांना झटपट श्रीमंतही केले. काही काळातच तालुक्यात केबीसीच्या एंजटांचा सुळसुळाट झाला. कंपनी साखळी पध्दतीने काम करत असल्याने एजंटांनी आपल्या ओळखीच्या लोकांना हळुहळू जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. कंपनीचे अनेक एजंट काही काळातच गर्भश्रीमंत झाले. कंपनीच्या सूचनेप्रमाणे झटपट श्रीमंत झालेल्या या एजंटांनी आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत सर्वसाधारण नागरिकांना कंपनीच्या जाळ्यात ओढले. केबीसीच्या माध्यमातून श्रीमंत झालेल्या एजंटांनी मोठी घरे बांधणे, महागडी वाहने घेणे, घरावर व वाहनावर केबीसीचे नाव टाकणे व कंपनीच्या माध्यमातून आपण कसे झटपट श्रीमंत झालो याच्या सुरस कथा लोकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे अल्पावधीतच कंपनीचे मोठे जाळे तालुक्यात निर्माण झाले. विशेष म्हणजे कंपनीच्या एजंटांमध्ये अनेक प्रतिष्ठितांचा समावेश असल्याने नागरिकांनी कंपनीच्या गुंतवणुकीवर सहज विश्वास ठेवला. एजंटांची झटपट श्रीमंती पाहून व त्यांच्या सुरस कथा ऐकून सर्वसामान्य शेतकरी, नोकरदारवर्ग, व्यापारी, पोलीस, राजकारणी आदींनी कंपनीच्या योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली. विशेष म्हणजे समाजाला ज्ञानदान करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकांचा केबीसीच्या गुंतवणूकदारांमध्ये मोठा भरणा आहे.
कंपनी बुडणार असल्याची जाणीव सर्वात अगोदर एजंटांना झाली होती. कंपनी लवकरच बुडणार असल्याचा अंदाज येताच एजंट फरार झाले. कंपनी बुडाल्याची माहिती कळताच गुंतवणूकदारांनी एजंटांकडे धाव घेतली. एजंट मंडळी फरार झाल्याचे व आपले पैसे बुडाल्याचे लक्षात येताच संतापलेल्या गुंतवणूकदारांनी सापडेल त्या एजंटला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीच्या अशा अनेक घटना तालुक्यात मागील चार दिवसात घडल्या असून दिवसेंदिवस या प्रकारामध्ये वाढ होत आहे. या सर्व प्रकारातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडसह इतर सामाजिक संघटनांनी केली आहे. (वार्ताहर)
उच्च शिक्षितही जाळ्यात
केबीसीच्या जाळ्यात अनेक उच्चशिक्षितही अडकलेले आहेत. शिक्षक आणि प्राध्यापकांचा गुंतवणूकदारात समावेश असून त्यांचे पाहून अनेक सामान्य नागरिकांनी केबीसीमध्ये जमीनजुमला विक्री करुन गुंतवणूक केल्याची माहिती आता पुढे येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्यात गोंधळाचे वातावरण आहे.

Web Title: Agent-Investor Hand Held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.