एजंटला अटक, तपास एलसीबीकडे वर्ग

By Admin | Updated: July 27, 2014 01:16 IST2014-07-27T00:45:29+5:302014-07-27T01:16:51+5:30

नांदेड : नाशिक येथील केबीसी ग्रुप आॅफ कंपनीमध्ये पैसे गुंतवायला लावून संबंधितांना सुमारे सव्वाकोटी रुपयांना फसविल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला.

Agent arrested, investigates class at LCB | एजंटला अटक, तपास एलसीबीकडे वर्ग

एजंटला अटक, तपास एलसीबीकडे वर्ग

नांदेड : नाशिक येथील केबीसी ग्रुप आॅफ कंपनीमध्ये पैसे गुंतवायला लावून संबंधितांना सुमारे सव्वाकोटी रुपयांना फसविल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित एजंटला वजिराबाद पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग करण्यात आल्याची अधिकृत माहिती आहे.
केबीसी कंपनीचा घोटाळा संपूर्ण राज्यात गाजतो आहे. कंपनीने प्रत्येक शहरात कमीशन एजंट नियुक्त करुन त्यांना तीन वर्षांत रक्कम दुप्पट करुन देण्याचे योजनाबद्ध कार्यक्रम आखून दिला. जनतेकडून पैसे गोळा करुन कंपनीमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी संबंधित एजंटवर होती. गुरुद्वारा व परिसरातील एजंट म्हणून गुरुसागरसिंघ दयालसिंघ सुखमनी काम पाहत होते. ते गुरुद्वारा बोर्डाचे सेवानिवृत्त अकाऊंटंट आॅडीटर आहेत. सुखमणी यांनी गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी, नातेवाईक, मित्रमंडळी अशांना विश्वासात घेवून त्यांना केबीसीचे सभासद होण्यास भाग पाडले. १७ हजार २०० रुपये घेवून १० हजारांची पावती त्यांनी दिली. ८६ हजार रुपये घेवून ५० हजारांची पावती दिली. यासंदर्भात संबंधित सभासदांनी विचारणा केली असता केबीसी मल्टीट्रेड कंपनी आहे. उर्वरीत रक्कम दुसऱ्या खात्यात भरली जात आहे. मात्र तीन वर्षानंतर तुम्हाला ठरलेली रक्कम व्याजासह परत केली जाईल, असे आश्वासन दिल्याने सुखमणी यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी पैसे गुंतविले. एकूण ३०१ जणांचे सव्वा कोटी रुपये सुखमणी यांच्याकडे लोकांनी गुंतविले.
जानेवारी २०१२ पासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. अचानक फेब्रुवारी २०१४ मध्ये केबीसीमध्ये बेकायदेशीर काय चालू आहे? हे तपासण्याच्या नावाखाली काही पुढाऱ्यांनी चौकशीचा ससेमीरा कंपनीच्या मागे लावला. केबीसीच्या महाराष्ट्र बँकेतील ७८ कोटी व एसबीआय बँकेतील ३४ कोटी रुपये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सील केले, असे सर्व एजंटांना कंपनीतर्फे सांगण्यात आले. म्हणून रक्कम कमी झाली आणि कंपनीने सभासदांना पैसे परत करणे बंद केले. तेव्हा आपण फसल्या गेलो, याची उपरती अनेकांना झाली आणि पाच-सहा जणांनी मराठवाड्यात आत्महत्याही केल्या आहेत.
नांदेड गुरुद्वारा बोर्डातील माजी कर्मचारी स. गगणसिंघ नारायणसिंघ यांनी यासंदर्भात १७ जुलै रोजी वजिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद देवून सुखमणी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून २४ जुलै रोजी सुखमणी यांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
वजिराबादचे सहाय्यक फौजदार एस.पी. गायकवाड यांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला. आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Agent arrested, investigates class at LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.