पुन्हा राष्ट्रवादी नाही...!
By Admin | Updated: April 10, 2017 23:59 IST2017-04-10T23:58:49+5:302017-04-10T23:59:34+5:30
आष्टी :माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीत परतणार नाही, असे स्पष्ट केले.

पुन्हा राष्ट्रवादी नाही...!
आष्टी : मी पंकजा मुंडेंना जिल्हा परिषदेमध्ये का मदत केली याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीने मागितले असते, तर आपण त्यांना उत्तरही दिले असते. परंतु स्वत:ला राज्याचे नेते म्हणून फिरणाऱ्या कानपुक्याचं ऐकून राष्ट्रवादीने माझ्या एकट्याचे नव्हे तर १ लाख १५ हजार कार्यकर्त्यांचे निलंबन केले. आता पुन्हा रिव्हर्स गिअर नाही, असा सूचक निर्धार करून माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीत परतणार नाही, असे स्पष्ट केले.
चार दिवसापूर्वी राष्ट्रवादीने धस यांचे पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन केले. येणाऱ्या काळात कोणत्या पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे ? यासाठी सोमवारी त्यांनी एका मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेतला. याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी मदनलाल बांदल, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, देविदास धस, अनिल ढोबळे, जि. प. सदस्य अॅड. प्रकाश कवठेकर, रोहिदास पाटील, नवाब खॉन, बळीराम पोटे, तात्यासाहेब हुले, युवराज पाटील, परमेश्वर शेळके, यशवंत खंडागळे, जयदत्त धस, मनोज सुरवसे, रंगनाथ धोंडे उपस्थित होते.
धस म्हणाले, जिल्हातील राष्ट्रीवादीच्या प्रत्येक नेत्यावर माझे उपकार आहेत. माझ्यावर कुणाचे नाहीत. गेल्या विधानसभेत प्रकाश सोळंके ३५ हजार, अमरसिंह पंडित ४० हजार व राज्याचे राजकारण करणारे धनजंय मुंडे यांना २५ हजार मतांनी पराभव पहावा लागला आहे. बारा वर्षांपूर्वी भाजप सोडण्याचा व आता राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय फक्त मला राज्याचे नेते म्हणविणाऱ्या नेत्यांमुळेच घ्यावा लागला, असे सांगून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका केली. शेतकरी, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम कटीबद्ध आहोत. सत्ता असताना व नसतानाही जनतेच्या सेवेसाठी अविरत झटत आलो आहे. त्यामुळे जनतेचा कौल माझ्या बाजूने आहे. राष्ट्रवादीने माझ्यावर कारवाई केली असली तरी ते त्यांना महागात पडेल, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी धस हाच आमचा पक्ष असल्याच्या घोषणा दिल्या. दीपक निकाळजे, अशोक इथापे, रमेश तांदळे, शेख शरीफ, अबरार शेख, सुनील रेडेकर, भारत मुरकूटे यांच्यासह मतदारसंघातील धस समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)