एजंटांना रोखण्याची मदार पुन्हा सुरक्षारक्षकांवर

By Admin | Updated: March 15, 2016 00:36 IST2016-03-15T00:36:01+5:302016-03-15T00:36:01+5:30

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांना पळविणाऱ्या एजंटांना रोखण्यासाठी एस. टी. महामंडळाने प्रवासी मित्र पथकाची स्थापना केली होती;

Again security forces prevent agents | एजंटांना रोखण्याची मदार पुन्हा सुरक्षारक्षकांवर

एजंटांना रोखण्याची मदार पुन्हा सुरक्षारक्षकांवर


औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांना पळविणाऱ्या एजंटांना रोखण्यासाठी एस. टी. महामंडळाने प्रवासी मित्र पथकाची स्थापना केली होती; परंतु अवघ्या काही दिवसांत हे पथक बरखास्त करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एजंटांना रोखण्याची मदार ही सुरक्षारक्षकांवर आली आहे. यातून पुन्हा एकदा बसस्थानकात एजंटगिरी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या ‘पूना है क्या, चलो पूना’ असे म्हणत प्रवाशांच्या मागे मागे फिरणारे एजंट दिसतात. अनेक प्रवासी त्यांना टाळतात, तर अनेक जण घाई गडबडीमुळे त्यांच्या सोबत जातात. अनेक वेळा प्रवाशांना यातून गैरसोयीला सामोरे जावे लागते. शिवाय यातून एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे बसस्थानकावर एजंटांना रोखण्यासाठी एका सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. परंतु थेट बसस्थानकाच्या आतमध्ये फिरणारे एजंट पाहता हा प्रयत्न अपुरा पडत होता. त्यामुळे एजंटांना रोखण्यासाठी बसस्थानकात प्रवासी मित्र पथकाची स्थापना करण्यात आली. यासाठी महामंडळातील काही चालक-वाहकांची निवड करण्यात आली. त्यांना कामाची जबाबदारीही वाटून देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून हे पथक प्रवाशांना पळविणाऱ्या दलालांवर नजर ठेवत होते. प्रवाशांना बसस्थानकातून बाहेर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही एजंटांना पकडून पथकाने पोलिसांच्या स्वाधीनही केले. परंतु पथकातील चालक-वाहकांना या कामाव्यतिरिक्त कोणतेही काम देण्यात येत नव्हते. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढत होता. त्यामुळे हे पथक बरखास्त करून पुन्हा एकदा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे.
पथकातील कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे विविध मार्गांवरील बसेसवर जाण्याची ड्यूटी लावण्यात आली आहे. प्रवासी मित्र पथक बरखास्त करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती बसस्थानकप्रमुख विजय बोरसे यांनी दिली.
एका शिफ्टमध्ये ४ सुरक्षारक्षक
बसस्थानकावर एका शिफ्टमध्ये ४ सुरक्षारक्षक तैनात करण्यात येत आहेत. बसस्थानकाचा विस्तार पाहता हे सुरक्षारक्षक अपुरे पडण्याची परिस्थिती आहे. त्यातून पुन्हा एजंटांकडून प्रवासी पळविण्याचा प्रकार अधिक होण्याची शक्यता आहे.

Web Title: Again security forces prevent agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.