बाद मतांमुळे झाला दिग्गजांचा पराभव

By Admin | Updated: September 20, 2014 23:40 IST2014-09-20T23:37:46+5:302014-09-20T23:40:34+5:30

अभिमन्यू कांबळे, परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत बाद मतांमुळे सात दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला

After the vote, the defeat of veterans | बाद मतांमुळे झाला दिग्गजांचा पराभव

बाद मतांमुळे झाला दिग्गजांचा पराभव

अभिमन्यू कांबळे, परभणी
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत बाद मतांमुळे सात दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला असून, चारही मतदार संघात प्रत्येकी दोन निवडणुकींचा यामध्ये समावेश आहे़
परभणी विधानसभेच्या १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ए़ आऱ गव्हाणे यांनी काँग्रेसचे उमेदवार एम. एस. राव यांचा १ हजार ३०५ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत तब्बल २ हजार ५७९ मते बाद झाली होती़ १९७८ मध्ये काँग्रेसच्या रावसाहेब जामकर यांनी शेकापचे अण्णासाहेब गव्हाणे यांचा २ हजार ८४ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत २ हजार १४९ मते बाद झाली होती़ पाथरी विधानसभा मतदारसंघात १९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार बबन सोपानराव यांनी काँग्रेसचे उमेदवार सखाराम गोपाळराव यांचा केवळ १४२ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत १ हजार ९४३ मते बाद झाली होती़ १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सखाराम नखाते यांनी यु काँग्रेसचे बाबासाहेब डख यांचा १ हजार ६१० मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत २ हजार ५१४ मते बाद झाली होती़ गंगाखेड विधानसभा मतदार संघात १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांनी भाजपाचे ज्ञानोबा हरी गायकवाड यांचा ४७६ मतांनी पराभव केला़ या निवडणुकीत २ हजार ६४३ मते बाद झाली होती़ १९९९ मध्येही घनदाट यांनीच गायकवाड यांचाच ६ हजार ७९६ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत तब्बल १३ हजार ९७१ मते बाद झाली होती़
जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकापचे गुलाबचंद राठी यांनी काँग्रेसचे माणिकराव भांबळे यांचा ६२६ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत १ हजार ९७१ मते बाद झाली होती़ १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे कुंडलिकराव नागरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर यांचा ३ हजार २८१ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत तब्बल ७ हजार ९४२ मते बाद झाली होती़
ज्ञानोबा गायकवाड यांचा विक्रम हुकला
विधानसभा निवडणुकीतील बाद मतांमुळे या सात दिग्गजांना पराभव पहावा लागला़ विशेष म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदार संघातून तब्बल चार वेळा निवडून आलेल्या ज्ञानोबा गायकवाड यांचा दोन वेळा बाद मतांमुळे पराभव झाला़ अन्यथा त्यांच्या नावावर जिल्ह्यात वेगळाच विक्रम नोंदवला गेला असता़ कारण जिल्ह्यात आतापर्यंत सहा वेळा निवडून येणारा एकही विधानसभा सदस्य नाही़
१७६ मते हरवली
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत एक वेगळाच विक्रम नोंदविला गेला़ परभणी विधानसभा मतदार संघात १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत १७६ मते गहाळ झाली़ तशी नोंद निवडणूक आयोगाकडे आहे़ ही मते कोठे गायब झाली, याचा पत्ताच निवडणूक आयोगाला लागला नाही़ परंतु, या बाद मतांचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला नाही़ कारण या निवडणुकीत शिवसेनेचे तुकाराम रेंगे यांनी काँग्रेसचे उमेदवार शमीम अ. खान यांचा तब्बल १९ हजार ३५४ मतांनी पराभव केला होता़
२००४ पूर्वी मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान करण्याची पद्धत होती़ त्यामुळे काही मतदार एकपेक्षा अधिक उमेदवारांच्या चिन्हासमोर शिक्का मारत असत़ त्यामुळे त्यांची मते बाद ठरविली जात होती; परंतु, २००४ मध्ये निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदानास सुरुवात केली़ त्यामुळे शिक्का मारून बाद होणारी मतांची प्रक्रियाच हद्दपार झाली़

Web Title: After the vote, the defeat of veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.