चिमुकलीच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग

By Admin | Updated: November 3, 2014 00:39 IST2014-11-03T00:37:32+5:302014-11-03T00:39:33+5:30

उस्मानाबाद : शहरातील रसूलपुरा भागातील आयशा शेख या दोन वर्षीय बालिकेचा तुंबलेल्या नालीत पडल्याने मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे़

After the death of Chimukli, wake up to the administration | चिमुकलीच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग

चिमुकलीच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग


उस्मानाबाद : शहरातील रसूलपुरा भागातील आयशा शेख या दोन वर्षीय बालिकेचा तुंबलेल्या नालीत पडल्याने मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे़ या भागातील नाल्यांच्या साफसफाईस रविवारी सकाळपासूनच प्रारंभ करण्यात आला आहे़ अगोदरच अरूंद असलेल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे बिकट अवस्था झाली असून, रस्ता दुरूस्तीकडे मात्र, दुर्लक्ष कायम आहे़
शहरातील ख्वॉजानगर भागातील रसुलपुरा परिसरात राहणारे अन्वर शेख यांची दोन वर्षाची मुलगी आयशा हिचा तुंबलेल्या नालीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली होती़ घटनेनंतर नागरिकांमधून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता़ पदाधिकाऱ्यांनी घटनेकडे पाठ फिरविली होती़ तर तहसीलदार व मुख्याधिकारी नंदा यांनी घटनास्थळाला भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन करीत या भागातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते़ या भागात रविवारी सकाळीच पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गटारी साफ करण्याची मोहीम हाती घेतली होती़ त्यावेळी मुख्याधिकारी नंदा यांनी काही काळ या भागात तळ ठोकला होता़ या भागातील बहुतांश गटारी या कचऱ्याने पूर्णत: बुजल्या असून, गटारींची अवस्था बिकट असल्याने पाणी ठिकठिकाणी तुंबत आहे़ अरूंद रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, दुचाकीही या मार्गावरून चालविणे मुश्किल होवून बसले आहे़ तर अनेकांची मोठी वाहने या भागात येवू शकत नसल्याने रात्रीच्यावेळी दर्गाह नजीक लॉक करून लावण्यात येत आहेत़ या भागात पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर असून, काही भागात आठ दिवसातून एकदा तर काही भागात १२ ते १५ दिवसाला पाणी येत असून, अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी केल्या़ रसुलपुरा भागात दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून साफसफाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भागातील समस्या पाहता प्रशासनाने स्वच्छतेची मोहीम आठवड्यातून एकदा राबवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: After the death of Chimukli, wake up to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.