न्यायालयाच्या आदेशानंतर औरंगाबाद मनपाच्या जलतरणिकेचे दर पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:48 IST2018-01-22T13:46:25+5:302018-01-22T13:48:08+5:30
महापालिकेने सिद्धार्थ जलतरण तलावाच्या दरात दोन वर्षांपूर्वी भरमसाठ वाढ केली होती. या दरवाढीला नागरिकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार आता सुधारित दरपत्रक प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केले आहे. २४ जानेवारी रोजी या नवीन दरपत्रकाला मंजुरी मिळणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर औरंगाबाद मनपाच्या जलतरणिकेचे दर पूर्ववत
औरंगाबाद : महापालिकेने सिद्धार्थ जलतरण तलावाच्या दरात दोन वर्षांपूर्वी भरमसाठ वाढ केली होती. या दरवाढीला नागरिकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार आता सुधारित दरपत्रक प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केले आहे. २४ जानेवारी रोजी या नवीन दरपत्रकाला मंजुरी मिळणार आहे.
२९ जानेवारी २०१६ रोजी सिद्धार्थ जलतरणचे दर वाढविण्यात आले होते. या दरवाढीविरोधात नंदकिशोर दांडेकर यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने वाढील शुल्कवाढीला स्थगिती आदेशाद्वारे ब्रेक लावला. स्थगिती आदेश संपताच महापालिकेने वाढीव दर आकारण्यास सुरुवात केली. याचिकाकर्त्याने परत खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने हे प्रकरण आयुक्तांनी आपल्या स्तरावर सोडवावे, असा आदेश दिला. खंडपीठाच्या आदेशानंतर महापालिकेने शहरातील विविध खाजगी जलतरणिकेच्या दराचा आढावा घेतला. मनपापेक्षा खाजगी जलतरण तलावाचे दर तीन ते चार पट जास्त आहेत.
‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर माफक दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दरपत्रक तयार करून मंजुरीसाठी प्रशासनाने २४ जानेवारीच्या स्थायी समितीसमोर ठेवले आहे. कुटुंबासाठी सध्या असलेले दरच नवीन दरपत्रकात प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये कोणताही बदल प्रशासनाने केलेला नाही. लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. सिद्धार्थ जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणार्या नागरिकांची संख्या जवळपास चारपट वाढते.
जुने व नवीन दर असे
कालावधी सध्याचे दर प्रस्तावित दर
मासिक १,८०० १,५००
त्रेमासिक ४,००० ३,५००
वार्षिक १०,००० ८,०००
आजीव ४०,००० ३५,०००