२५ वर्षानंतर जलशुद्धीकरण झाले शुद्ध
By Admin | Updated: July 17, 2017 00:11 IST2017-07-17T00:09:45+5:302017-07-17T00:11:26+5:30
जिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़

२५ वर्षानंतर जलशुद्धीकरण झाले शुद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़ शुद्धीकरणाच्या हौदात दुर्गंधीयुक्त घाण, कीटक आणि गाळ निघाल्याने जिंतूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार होता, असे पालिकेच्या मोहिमेनंतर लक्षात आले़ या हौदातून सुमारे ८ ते १० ट्रॅक्टर गाळ उपसण्यात आला आहे़
२५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेले जलशुद्धीकरण केंद्र यापूर्वी कधीच साफ केले नव्हते़ शुद्धीकरण केंद्राच्या जवळपास फिरकणे देखील अशक्य ठरेल़, एवढी दुर्गंधी स्वच्छता करताना दिसून आली़ या केंद्रात मेलेल्या किड्यांचा वास, नालीतील घाणीसारखी घाण उपसण्यात आली आहे़ २५ ते ३० मजूर ही घाण साफ करीत होते़ पाण्याच्या हौदाला चारही बाजुंनी मृत कीटक व माशा दिसत होत्या़ नव्याने आलेले नगरअभियंता विनय आडसकर, मुख्याधिकारी जयंत सोनुने, नगराध्यक्ष फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक मनोहर डोईफोडे, कपिल फारुखी, दलमीर पठाण, शाहीद बेग मिर्झा, दत्ता काळे, फिरोज कुरेशी, शेख इस्माईल यांच्यासह पाणीपुरवठा सभापती उस्मान खान पठाण हे दोन दिवसांपासून या अभियानात आहेत़ हा गाळ काढून संपूर्ण हौद, नलिका धुवून घेतल्या़ शहराला इतके दिवस अशुद्ध पाणी येत असल्यानेच साथीचे आजार बळावत असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे़ पालिकेने स्वच्छतेचे घेतलेले हे काम शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे़