संपन्न कुटुंबांनी विद्यार्थी दत्तक घ्यावेत

By Admin | Updated: August 17, 2014 01:43 IST2014-08-17T01:26:21+5:302014-08-17T01:43:49+5:30

नजीर शेख, औरंगाबाद प्रत्येक कुटुंबाने एक किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दत्तक घ्यावेत, अशी भूमिका प्राचार्य डॉ. मगदूम फारुकी यांनी मांडली.

The affluent families should adopt the students | संपन्न कुटुंबांनी विद्यार्थी दत्तक घ्यावेत

संपन्न कुटुंबांनी विद्यार्थी दत्तक घ्यावेत

नजीर शेख, औरंगाबाद
शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी, तसेच गरीब कुटुंबांनाही शिक्षणाची संधी मिळण्यासाठी माझ्या शहरातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने एक किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दत्तक घ्यावेत, अशी भूमिका मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मगदूम फारुकी यांनी मांडली.
‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी भौतिक सुविधांबरोबरच सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे स्पष्ट केले. राज्य सरकारतर्फे शिक्षणाच्या मोठ्या प्रमाणावर सोयी निर्माण झाल्या असल्या तरी अजूनही आपल्याकडे उच्च शिक्षण किंवा अगदी बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण कमीच आहे. आपल्या राज्यातील साक्षरता ८२ टक्क्यांहून अधिक आहे; मात्र उच्च शिक्षणाची टक्केवारी २० टक्क्यांहून कमी आहे. कारण शिक्षणाच्या सुविधा असल्या तरी आर्थिक विवंचनेमुळे अनेक कुटुंबांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करणे अशक्य होऊन जाते. काही कुटुंबांमध्ये बालके काम करून रोजीरोटी कमावतात व आपल्या कुटुंबाला हातभार लावतात. त्यामुळेही पालक अशा मुलांना शाळेत पाठवत नाहीत. या पालकांना शिक्षणाचे महत्त्व आणि त्याचा मुलाच्या भावी आयुष्यात होणारा फायदा याचे भान नसते; मात्र आपल्यासारख्या उच्च शिक्षण घेतलेल्या, व्यवसायात, नोकऱ्यांमध्ये स्थिर झालेल्या नागरिकांना याचे भान असते. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करतो.
शिक्षण हा देश विकासाचा एक मार्ग आहे. अनेक राष्ट्रे उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या बळावर प्रगतीकडे झेपावली आहेत. हा फार मोठा विचार झाला तरी आपण आपल्या पातळीवर या शहरासाठी काय करू शकतो, याचा विचार होणे आवश्यक आहे. खरे तर सांगायची ही गोष्ट नाही; परंतु मागील काही वर्षांपासून मी काही मुलांची शैक्षणिक फी भरत आहे. माझ्या वेतनातून ही रक्कम कपात होते. आपण स्वत: आधी करावे आणि नंतर लोकांना सांगावे, या हेतूनेच मी हे सांगितले. माझ्या मते, आपल्या शहरात सामाजिक जाणिवेचे खूप लोक आहेत. अनेक जण असे कार्य करीतही असतील; मात्र हे काम आणखी वाढले पाहिजे.
ज्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, त्यांनी शहरातील त्यांना जवळ असणाऱ्या किंवा सोयीच्या शाळेत जावे. तेथील मुख्याध्यापक, प्राचार्यांना भेटून गरीब व गरजू विद्यार्थ्यांची माहिती घ्यावी. दरमहा या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागेल एवढी मदत तर करावीच; परंतु त्यापुढे जाऊन त्या मुलांचा आहार, आरोग्य, शाळेतील उपस्थिती आणि त्यांची शैक्षणिक प्रगती याविषयीही काळजी घ्यावी. या भूमिकेतून सुरुवातीला काही लोक जरी पुढे आले तरी त्यांच्यातून इतरांना प्रेरणा मिळेल आणि या कामाला गती मिळू शकेल, असे वाटते. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले शहर शैक्षणिकदृष्ट्याही पुढे असायला हवे. आज वर्तमानपत्रे, मोबाईल, व्हॉटस्अप, फेसबुक आणि इतर अनेक साधने अस्तित्वात आहेत. याचाही उपयोग या कामासाठी होऊ शकतो. हे एक ‘मिशन’ माझ्या शहरात सुरू व्हायला पाहिजे, असे मला वाटते.

Web Title: The affluent families should adopt the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.