जवळबन येथे पीडित युवतीची आत्महत्या
By Admin | Updated: May 10, 2014 23:50 IST2014-05-10T23:35:59+5:302014-05-10T23:50:11+5:30
केज: तालुक्यातील जवळबन येथील बलात्कारपीडित युवतीने वर्षभरानंतर निराश होऊन आत्महत्या केली.

जवळबन येथे पीडित युवतीची आत्महत्या
केज: तालुक्यातील जवळबन येथील बलात्कारपीडित युवतीने वर्षभरानंतर निराश होऊन आत्महत्या केली. या घटनेने महिला अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे़ अश्विनी प्रभू वैरागे (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. युसूफवडगाव पोलीसांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी गावातीलच प्रशांत करपे या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला होता़ त्यानंतर तिने युसूफवडगाव ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़ घटनेनंतर नराधमाला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या होत्या़ गेल्या काही दिवसांपासून तो बीडच्या जिल्हा कारागृहात आहे. या घटनेपासून अश्विनी निराश झाली होती़ तिच्यावर झालेल्या अत्याचारातून ती मानसिकदृष्ट्या सावरली नाही. अशातच शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घरातील आडूला दोरीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली़ त्यानंतर युसूफवडगाव ठाण्याच्या पोलीसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. केज ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर युवतीचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी युसूफ वडगाव ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, उपअधीक्षक अभय डोंगरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मयत युवतीच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात येतील. तपास योग्य दिशेने सुरू आहे. कोणावरही अन्याय होणार नाही. (वार्ताहर) विशेष तपास पथक नेमा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी पीडित युवतीच्या आत्महत्येची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. दलितांवरील वाढते अत्याचार चिंताजनक आहेत़ बीड व अहमदनगर हे जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावेत़ तसेच विशेष पथकामार्फत तपास करावा, अशी मागणी केली़ पोटभरे यांनी शनिवारी वैरागे कुटुंबियांची भेट घेऊन दिलासा दिला़