आघाडीतील बेबनावाचा तुळजापुरात महायुतीला लाभ
By Admin | Updated: May 18, 2014 00:49 IST2014-05-18T00:27:05+5:302014-05-18T00:49:14+5:30
संतोष मगर , तामलवाडी सुमारे ३५ वर्षे जिल्ह्यासह राज्यात सत्तेत राहिलेल्या डॉ़पद्मसिंह पाटील यांचा तब्बल अडीच लाख मतांनी दारूण पराभव झाला आहे़

आघाडीतील बेबनावाचा तुळजापुरात महायुतीला लाभ
संतोष मगर , तामलवाडी सुमारे ३५ वर्षे जिल्ह्यासह राज्यात सत्तेत राहिलेल्या डॉ़पद्मसिंह पाटील यांचा तब्बल अडीच लाख मतांनी दारूण पराभव झाला आहे़ विशेष म्हणजे राज्याचे दुग्धविकासमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या तुळजापूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रा़रवींद्र गायकवाड यांना ३४ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. पदाधिकार्यांमधील बेबनावात आघाडी धर्माला तिलांजली दिल्यामुळे महायुतीचा विजय सुकर झाला असला तरी, मतांची ही आघाडी वर्षानुवर्षे आमदार म्हणून सत्तेत राहिलेल्या पालकमंत्र्यांसाठीही धोक्याची घंटा असल्याचे आता तालुक्यातील नागरिकांतून बोलले जात आहे़ तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर जवळपास १५ वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व आहे़ जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीही ताब्यात असून, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समितीवरही आघाडीचा झेंडा आहे़ महायुतीकडे सत्तास्थाने नसली तरी त्यांनी ठेवलेला जनसंपर्क हा लोकसभा निवडणुकीसाठी फायदेशीर ठरला़ काटी, मंगरूळ, सिंदफळ, काक्रंबा या जि.प. गटावर आघाडीचेच वर्चस्व आहे़ ग्रामपंचायत निवडणुका मात्र स्वतंत्रपणे आणि एकमेकांवर कुरघोड्या करून लढविल्या जातात़ आघाडी होते ती केवळ आमदार, खासदारकीच्या निवडणुकीत! त्यामुळे गावपातळीवरील नाराज गटाला आपल्याकडे खेचण्याची कसरत संबंधितांना लोकसभेच्या आखाड्यात करावी लागली़ बंद पडलेला साखर कारखाना, डबघाईला आलेली जिल्हा बँक, शेतीमालाला मिळत असेला कमी भाव आणि वाढलेली महागाई याचाही थेट फटका डॉ़ पाटील यांनाच सोसावा लागला़ गत पंधरा वर्षांपासून उजनीचे पाणी तुळजापूरला आणण्याचे आश्वासन केवळ वल्गनाच राहिली़ विशेष म्हणजे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी विकास कामे केली असली तरी मोदींनी जागविलेल्या विकासाच्या आशा, सर्वसामान्यांशी निगडित मुद्यांना घातलेला हात आणि सत्ताधार्यांविरोधात असलेला रोष हा यावेळी प्रकर्षाने मतदानातून दिसून आला़ यावर कडी केली ती मोदी लाटेने, घराघरात नमो-नमोचा जप यामुळे गत निवडणुकीत ११०० मतांची असलेली आघाडी यंदा तब्बल ३४ हजारावर गेली़ मोदी लाटेबरोबरच दोन्ही काँग्रेसमधील बेबनाव डॉ़ पाटील यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे़ जाहीर सभेत बोलल्या प्रमाणे नेते वागले असते तर तालुक्यातील मताधिक्कयाचे चित्र वेगळे दिसले असते. असे अनेकजण आता बोलून दाखवित आहेत. लोकमंगल उद्योग समुहाच्या माध्यमातून केलेले काम व युवक नेतृत्वाच्या बळावर रोहन देशमुख यांनीही जंगजंग पछाडले़ मात्र, त्यांनी केलेली बंडखोरी आणि तुळजाभवानी कारखाना चालविण्यात आलेले अपयश या बाबी तालुकावासियांना रूचल्या नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे त्यांनी अहोरात्र केलेली मेहनात त्यांची अनामत रक्कमही वाचवू शकली नाही़ अनेकांनी त्यांनी विधानसभेची रंगीत तालीम घेतल्याचे म्हटले़ मात्र, पालकमंत्र्यांचाच गड धोक्यात आल्याने देशमुखांची विधानसभेसाठी अपक्ष म्हणून डाळ शिजणार कशी? अशी चर्चा लोकमंगलच्या कार्यकर्त्यांमध्येच आता दबक्या आवाजात सुरू आहे़ महायुतीची नजर आता विधानसभेकडे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मरगळ आलेल्या महायुतीच्या विशेषत: शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोदी लाटेमुळे मोठा उत्साह संचारला आहे़ तालुक्यातील पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी मोदींच्या राज्याभिषेकापूर्वीच विधानसभेसाठी कंबर कसली असून, आघाडीची विधानसभेतही दाणादाण करण्यासाठीचे नियोजन सुरु केले आहे. मोदींचा करिश्मा आणि आघाडीतील बेबनाव या बळावर आता विधानसभाही फत्ते करु असा आत्मविश्वास तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व्यक्त करु लागले आहेत.