जिल्हा परिषदेच्या १५० शाळा दत्तक

By Admin | Updated: April 16, 2016 01:47 IST2016-04-16T01:06:05+5:302016-04-16T01:47:49+5:30

औरंगाबाद : तालुक्यातील जवळपास जिल्हा परिषदेच्या १५० शाळा ‘व्हर्च्युअल क्लासरूम’साठी दत्तक घेण्यास जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने अनुकूलता दर्शविली आहे.

Adoption of 150 schools of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या १५० शाळा दत्तक

जिल्हा परिषदेच्या १५० शाळा दत्तक


औरंगाबाद : तालुक्यातील जवळपास जिल्हा परिषदेच्या १५० शाळा ‘व्हर्च्युअल क्लासरूम’साठी दत्तक घेण्यास जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने अनुकूलता दर्शविली आहे.
शिक्षक सेनेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये ई- लर्निंगसाठी पुढाकार घेतला आहे. या संघटनेने सदरील संस्थेकडे ई-लर्निंगसाठी शाळा दत्तक घ्याव्यात म्हणून वारंवार पाठपुरावा केला
होता.
त्यानंतर मागील आठवड्यात या संस्थेच्या प्रकल्प विभागाचे पाटील व पुराणकर यांच्याशी शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस सदानंद माडेवार यांनी सविस्तर चर्चा केली. तेव्हा व्हर्च्युअल क्लासरूमबाबतचा प्रस्तावही सादर केला होता. या संघटनेने जिल्ह्यात लोकसहभागातून अनेक शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूमचे प्रयोग यशस्वी केले आहेत.
शिक्षक सेनेची याबाबतची भूमिका लक्षात घेऊन जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यातील १५० शाळा ई-लर्निंगसाठी दत्तक घेण्यास अनुकूलता दर्शविली. शिक्षक सेनेच्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासरूमला गती देण्यासाठी या संस्थेचे मोठे सहकार्य लाभणार आहे.
जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून यापूर्वी पैठण व गंगापूर तालुक्यातील सुमारे ५५० शाळांत अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता या संस्थेने औरंगाबाद तालुक्यातील जि. प. शाळांसाठी पुढाकार दर्शविला आहे. या निर्णयाचे स्वागत संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पोलास, सरचिटणीस सचिन एखंडे, प्रवीण लोहाडे, पंकज मंडगे, संदीपान जाधव, चंद्रकांत पालकर, दीपक रंगे, नामदेव हिलाल, गणेश मुळे, अशोक आघाव, भक्तराज कापुरे, अशोक चव्हाण, मनोज वानखेडे, जगदीश परदेशी, शिवाजी चिंतलवाड, अविनाश पाटील, राजेंद्र पाटील आदींनी केले आहे.
शिक्षक सेनेच्या माध्यमातून सदानंद माडेवार यांनी शाळांना आवाहन केले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावेत. प्रस्तावासोबत मागणी अर्ज, लाईट बिल व संस्थेच्या पूर्वपरवानगीने लोकसहभागातून जमा केलेल्या साडेपाच हजारांचा धनाकर्ष जोडावा लागणार आहे. अर्जाचा नमुना संस्थेच्या बजाजनगर येथील कार्यालयात अथवा शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावा.

Web Title: Adoption of 150 schools of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.