सहा वर्षांपासून पानवाडी गावावर ‘प्रशासकराज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:04 IST2021-04-05T04:04:57+5:302021-04-05T04:04:57+5:30
फुलंब्री : तालुक्यातील पानवाडी ग्रामपंचायतीवर मागील सहा वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. नगरपंचायतीत समावेश करून घेण्यास विरोध झाल्याने या गावाचे ...

सहा वर्षांपासून पानवाडी गावावर ‘प्रशासकराज’
फुलंब्री : तालुक्यातील पानवाडी ग्रामपंचायतीवर मागील सहा वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. नगरपंचायतीत समावेश करून घेण्यास विरोध झाल्याने या गावाचे भविष्य राजकीयदृष्ट्या अधांतरी अडकले आहे.
पूर्वी फुलंब्री व पानवाडी ही दोन गावे मिळून ग्रामपंचायत होती. पण जून २०१५ मध्ये फुलंब्री ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. यात पानवाडी गावाला ग्रामपंचायत जाहीर करण्यात आली. पण या ग्रामपंचायतीचा महसुली भाग कुठंपर्यंत असेल, यावर निर्णय झालाच नाही. परिणामी ग्रामपंचायतीवर गेल्या सहा वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतही पानवडी गावाचा समावेश करण्यात आला नाही.
नगरपंचायतीसाठी विरोध
गावातील एका गटाने शासनाकडे, पानवाडी गावाचा समावेश फुलंब्री नगरपंचायतीमध्ये करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार हालचाली सुरू झाल्या. यासंदर्भात प्रशासनाच्यावतीने नगरपंचायतीकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला. पण नगरपंचायतीने पानवाडी गावाचा फुलंब्रीमध्ये समावेश करू नये, असा ठराव मंजूर करून शासनाला पाठविला. यात पानवाडी येथील काही नागरिकांनीही अशाच प्रकारचे पत्र दिले आहे.
अडीच हजार लोकांचे भविष्य
पानवाडी गावाची एकूण लोकसंख्या सुमारे अडीच हजारावर आहे. या गावात मुस्लिम समाजाची संख्या सर्वाधिक आहे. डोंगरशिवारात गाव असल्याने शेतीशिवाय दुसरे उत्पनाचे साधन गावकऱ्यांचे नाही. त्यामुळे विकासापासून कोसो दूर हे गाव आहे. एकंदरीत गावाची अशी दुरवस्था आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत व्हावी किंवा नगरपंचायतीमध्ये समावेश व्हावा, यावर गेल्या सहा वर्षांपासून शासनदरबारी निर्णय पडून आहे.
दोन गटांचा परिणाम
पानवाडी गाव हे छोटे असले तरी, येथे राजकारणी नेते जास्तच आहेत. या गावात दोन गट असून एक गट नगरपंचायतीला समर्थन देतो, तर दुसरा गट त्याला विरोध करतो. त्यामुळे नेमका निर्णय काही केल्या लागत नाही.
सूचना -- फोटो नाही.