प्रशासनाच्या आवाहनाला ग्रामीण भागात खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:06 IST2021-04-23T04:06:33+5:302021-04-23T04:06:33+5:30
शहरी भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला असून मोठ्या प्रमाणात आप्तेष्टांना हिरावून नेले आहे. आता ग्रामीण भागाकडे या महामारीने ...

प्रशासनाच्या आवाहनाला ग्रामीण भागात खो
शहरी भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला असून मोठ्या प्रमाणात आप्तेष्टांना हिरावून नेले आहे. आता ग्रामीण भागाकडे या महामारीने आपला मोर्चा वळवला आहे. नागरिकांना वारंवार आवाहन करून सुद्धा नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करत असल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.
पिशोर हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून जवळपास ८५ खेड्यांचा संपर्क बाजारपेठेशी येतो. यामुळे येथील बाजारपेठेत खरेदी व इतर व्यवहारासाठी नागरिकांची कायम मोठी वर्दळ असते. शासनाने दवाखाने व औषधी दुकाने वगळता किराणा, शेती साहित्य, पेट्रोल पंप, भाजीपाला इत्यादी दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत सेवा देण्याची मुभा दिलेली आहे. मात्र अनेक व्यापारी व व्यावसायिक आपली दुकाने चोरुन लपून उघडी ठेवत आहे. येथील शफेपूर भागात गुरुवारी मोठी गर्दी दिसून आली. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे. शफेपूर वस्ती दाट लोकसंख्येची असून या गर्दीमुळे कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, संचारबंदी आदी नियमांचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. गावात ग्रामपंचायतीने प्रत्येक सहा प्रभागात समिती तयार केली आहे. परंतु याचा सुद्धा नागरिकांवर परिणाम होताना दिसत नाही. अशा नागरिकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया :
अगदी अपवाद वगळता सर्वच दुकानदार नियमांचे पालन करत आहेत. मात्र रस्त्यावर विनाकारण फिरणारे यांच्यावर कारवाई न करता दुकानदारांवर कारवाई केल्या जात आहे.
-बापूसाहेब हरणकाळ, अध्यक्ष व्यापारी संघ
कोट
पोलीस येताच नियमांचे पालन करत असल्याचे नागरिक व व्यापारी दाखवतात. मात्र ते गेल्यानंतर पुन्हा नियमांची पायमल्ली होत आहे. नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- हरिशकुमार बोराडे, सपोनि. पिशोर
कोट
कोरोनाची लागण झाल्यानंतर होणारा त्रास मी स्वतः अनुभवला असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे, ही विनंती आहे. नसता मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते.
- पी. एम. डहाके, माजी सरपंच
छायाचित्र : पिशोर मधील शफेपूर भागात झालेली नागरिकांची गर्दी.
220421\22_2_abd_88_22042021_1.jpg
पिशोर मधील शफेपूर भागात झालेली नागरिकांची गर्दी.