जिल्हास्तरावरुन होणार ३४ शिक्षकांचे समायोजन
By Admin | Updated: August 20, 2014 01:50 IST2014-08-20T01:21:58+5:302014-08-20T01:50:37+5:30
उमरगा : तालुक्यातील जि.प. च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी संख्येत घट झाल्याने ६८ शिक्षक अतिरिक्त झाले असून, ३३ शिक्षकांचे तालुक्यात विविध शाळांमधून

जिल्हास्तरावरुन होणार ३४ शिक्षकांचे समायोजन
उमरगा : तालुक्यातील जि.प. च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी संख्येत घट झाल्याने ६८ शिक्षक अतिरिक्त झाले असून, ३३ शिक्षकांचे तालुक्यात विविध शाळांमधून समायोजन करण्यात येणार असले तरी उर्वरित ३४ शिक्षकांचे जिल्हास्तरावरुन समायोजन करण्यात येणार असल्याने मागील अनेक वर्षापासून एकाच तालुक्यात कार्यरत असलेल्या ३४ शिक्षकांवर आता जिल्हा समायोजनाची टांगती तलवार आहे.
तालुक्यात जि.प. च्या एकूण १५१ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. पहिली ते आठवीपर्यंत एकूण ९ हजार २६५ मुले तर ९ हजार ९४९ मुली असे एकूण १९ हजार ८१४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ९ वी ते १० या माध्यमिक शाळांतून एकूण ८०१ मुले-मुली शिक्षण घेत आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी ५४१ पुरुष ९ वी ते १० वी या दोन वर्गासाठी ९२ शिक्षक माध्यमिक शाळांतून ज्ञानार्जन करीत आहेत.
शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने ३० सप्टेंबर २०१३ च्या विद्यार्थी संख्येवरुन शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. ३० सप्टेंबर अखेर पटसंख्या निश्चितीनंतर तालुक्यातील जि.प. १५१ विविध शाळांमधून ६८ शिक्षक अतिरिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. जन्मतारीख, प्रथम नेमणूक दिनांक, तालुक्यातील उपस्थित दिनांक ३० सप्टेंबर रोजी तालुक्यातील एकूण सेवा, सध्याच्या शाळेवरील उपस्थिती दिनांक, सध्याच्या शाळेवर ३० सप्टेंबर २०१३ पर्यंत एकूण सेवा, पती, पत्नी सेवेत असल्यास नाव पद व कार्यालय, अपंग, विधवा, परित्यक्त्या, मतिमंद विद्यार्थी, पालक, १२ वी शिक्षण शाखा या प्राधान्यक्रमाच्या निकषानुसार अतिरिक्त ठरलेल्या ६८ शिक्षकांची सेवाजेष्ठतेनुसार यादी तयार करण्यात आली आहे. १५१ शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या ३३ शिक्षकांचे तालुक्यातील विविध शाळेत रिक्त पदावर समायोजन करण्यात येत असले तरी सेवाजेष्ठतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या ३४ शिक्षकांचे जिल्हास्तरावरुन समायोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जिल्हास्तरावरून समायोजन होणाऱ्या शिक्षकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक तालुक्यांतून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन आता इतरत्र जिल्ह्यात होणार का? अशी धास्ती अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सतावत आहे. (वार्ताहर)