जिंतुरात आदिवासी समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: July 31, 2014 00:41 IST2014-07-30T23:45:45+5:302014-07-31T00:41:28+5:30
जिंतूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे घटनाबाह्य आहे़,
जिंतुरात आदिवासी समाजाचा मोर्चा
जिंतूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे घटनाबाह्य आहे़, असे सांगून त्यास विरोध करण्यासाठी आदिवासी समाजबांधवांनी बुधवारी जिंतूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ मोर्चात असंख्य महिला सहभागी होत्या़
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये, या मागणीला विरोध म्हणून आदिवासी समाजबांधवांनी शक्तिप्रदर्शन केले़ बिरसा मुंडा चौकातून सकाळी ११़३० वाजता मोर्चास सुरुवात झाली़ मुख्य चौकातून शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला़ यावेळी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले़
अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, केंद्र सरकारच्या आरक्षण सूचीमध्ये नामसदृश्य उल्लेखाचा गैरफायदा घेऊन आदिवासी समाजामध्ये हा समाज समाविष्ट करण्यात येत आहे़ बिहार, ओरिसा व झारखंड येथे धनगड ही जमात अनुसूचित जमातीमध्ये येते़ याचा गैरफायदा घेऊन धनगर समाज आरक्षण मागत आहे़ यास आदिवासी समाजाचा विरोध असून, धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केल्यास ९ आॅगस्टला मोठे आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे़
तहसीलदार राम बोरगावकर यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले़ प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास आदिवासी समाज तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे़ निवेदनावर प्रकाश शेळके, भगीरथ मिरासे, नारायण कोकाटे, राजेश्वर कऱ्हाळे, कुंडलिक निंबाळकर, प्रसाद माघाडे, डॉ़ सतीश पाचपुते, ज्ञानेश्वर घोगरे, खुशाल चिभडे, ज्ञानेश्वर दळवे, सुभाष सोनुने, भास्कर माघाडे, पंढरी चिभडे, किशन निंबाळकर, शिवप्रसाद घोगरे यांच्यासह आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत़ (वार्ताहर)
घोषणांनी जिंतूर दणाणले
आदिवासी समाजाने आपल्या हक्क आरक्षणात इतरांचा समावेश करू नये, यासंदर्भात मोर्चामध्ये जोरदार घोषणाबाजी केली़ या घोषणाबाजीमुळे जिंतूर शहर दणाणले़ राजकीय पक्षाला लाजवेल असा हा मोर्चा होता़ मोर्चातील मागण्यांचे फलक महिलांनी हातात धरून जोरदार घोषणाबाजी केली़
जिंतुरात पहिल्यांदाच शक्तीप्रदर्शन
आदिवासी समाजाने आपल्या न्याय्य हक्कासाठी मोठे शक्तिप्रदर्शन केले. विशेष म्हणजे तालुक्यामध्ये या समाजाचा मोठा नेता नाही केवळ समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात समाज बांधवांनी एकजुट दाखविली़ त्यातच मोर्चामध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचा समावेशही लक्षणीय होता़