व्यसनाधीनता चिंताजनक!

By Admin | Updated: July 29, 2014 01:13 IST2014-07-29T00:44:54+5:302014-07-29T01:13:22+5:30

औरंगाबाद : एकीकडे आई-वडील दोघेही कमावते असल्यामुळे भरपूर पॉकेट मनी मुलांच्या हातात खेळतो,

Addiction is worrisome! | व्यसनाधीनता चिंताजनक!

व्यसनाधीनता चिंताजनक!

औरंगाबाद : एकीकडे आई-वडील दोघेही कमावते असल्यामुळे भरपूर पॉकेट मनी मुलांच्या हातात खेळतो, तर दुसरीकडे घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मिळेल ते काम करून पैसे कमावले जातात. काही पैसे घरी द्यायचे आणि बाकीचे स्वत: खर्चायचे. मात्र, अशा प्रकारे मिळणाऱ्या पैशांमधून विविध पदार्थांचे व्यसन आणि नशा करण्याच्या आहारी अनेक लहान मुले जातात.
अशा मुलांना वेळीच व्यसनापासून दूर करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी काही जण प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेला हा आढावा.
ज्या वयात मुलांनी अभ्यास करायचा, खेळायचे असते, अशा कोवळ्या वयात अनेक मुले नशेच्या आहारी जातात. त्यामुळे बालकामगारांबरोबर व्यसनाधीन होणाऱ्या मुलांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे लहान वयातच काम करण्याची वेळ अनेक मुलांवर येते. दिवसभर कचरा, भंगार गोळा करणे, तसेच गॅरेज, किराणा दुकानात काम करून मिळणाऱ्या पैशांतून अनेक मुले नशा करतात. अशा मुलांच्या कुटुंबियांच्या उत्पन्नातून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत गरजा भागत नाहीत. त्यामुळे नाइलाजाने मुलांना काम करावे लागते. काही मुले शिक्षणापासून दूर जातात अन् काही व्यसनाच्या आहारी जातात.
सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आॅफ महाराष्ट्र या संस्थेचे डॉ. लक्ष्मण माने गेल्या तीन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित आणि व्यसनाकडे वळलेल्या मुलांना अभिरुची वर्गांच्या माध्यमातून समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
पालकांनी लक्ष द्यावे
सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आॅफ महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण माने या विषयी बोलताना म्हणाले की, व्हाईटनर, बाम असे पदार्थ मुलांना सहज उपलब्ध होतात. त्यावर नियंत्रण हवे. अनेक पालकांचे मुले काय करीत आहेत. मुलांकडील पैशांचे ते काय करतात, याकडे पालकांचे झालेले दुर्लक्ष, अशी त्याची कारणे आहेत. मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्यासाठी शासकीय पातळीवर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
वेळीच उपचाराची गरज
घाटी रुग्णालयातील मनोरुग्ण विभागप्रमुख डॉ. रश्मीन आंचलिया या विषयी बोलताना म्हणाले की, लहान मुले आनुवंशिकतेतून आणि परिसराच्या वातावरणातून नशेखोर होत असतात. मद्यपी अथवा कोणत्याही प्रकारची नशा करणाऱ्या वडिलांची मुलांमध्ये अटेन्शन डिफेक्टेड हायपर (एडीएचडी) हा आजार आढळतो. या आजाराची मुले अतिचंचल असतात. अशी मुले व्यसनाधीनतेकडे पटकन वळतात. ती मुले बालपणापासूनच आयोडेक्स, व्हाईटनर, सुलोचन आणि अल्कोहोलची मात्रा असलेले खोकल्याच्या औषधाची नशा करतात. शिवाय त्यांना तंबाखू, गुटख्यांसारखे व्यसनही लवकर लागते. सामाजिक वातावरणाचाही अशा मुलांवर लवकर परिणाम होतो. ते मद्यपी वडिलांचे अनुकरण करतात.
तसेच नशेखोर मुलांची सोबत करताना व्यसनाच्या आहारी जातात.
व्हाईटनर, बाम अन् सिगारेट
आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या ७ ते १५ वयाच्या मुलांमध्ये व्हाईटनर, पंक्चर जोडण्यासाठी वापरण्यात येणारे सोल्युशन, मेडिकलमधून सहज उपलब्ध होणारा बाम, नेलपेंटचे व्यसन दिसते. शिवाय सहज आणि अगदी कमी पैशांत व्यसनाची साधने मिळत असल्याने त्याकडे मुले वळतात. घरची परिस्थिती चांगली असलेली लहान वयातच सिगारेटच्या नादी लागतात.
४० मुले व्यसनमुक्त
शहरातील विविध भागांत घेण्यात येणाऱ्या अभिरुची वर्गात मुलांना विविध खेळ, गोष्टींच्या माध्यमातून विविध माहिती, ज्ञान दिले जाते. गेल्या तीन वर्षांत अभिरुची वर्गाच्या माध्यमातून डॉ. माने यांनी जवळपास ४० मुलांना व्यसनापासून दूर केले आहे.
मुलींमध्ये व्यसन
मुलांबरोबर व्हाईटनर, बाम, सोल्युशन यासह सुगंधी तंबाखू पदार्थांचे व्यसनाचे प्रमाण दिसते. कचरा वेचणाऱ्या मुलांचा आणि मुलींचे यात प्रमाण अधिक आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानकासह शहरातील काही भागात अशी व्यसनी मुले आढतात. एकमेकांच्या संपर्कात येणारी मुले व्यसनाकडे वळतात.
आरोग्य धोक्यात
या पदार्थांच्या सेवनाने मुलांना गुंगी येते. अधिक आहारी गेलेल्यांना त्यातून बाहेर काढणे अवघड होते. सतत या पदार्थांचा वास मुलांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे काही कालावधीनंतर या पदार्थांचे व्यसन केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अभ्यासाचा ताण घालविण्याठी ग्रुपने सिगारेट ओढण्याकडे मुले वळतात. मात्र, सहज उपलब्ध होणाऱ्या व्यसनाच्या या साहित्याच्या अतिसेवनाने मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

Web Title: Addiction is worrisome!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.