ग्रंथालये आधुनिक तंत्रज्ञाशी जोडावीत
By Admin | Updated: December 30, 2014 01:18 IST2014-12-30T00:49:13+5:302014-12-30T01:18:52+5:30
औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान अत्यंत अपुरे असते. त्यांना जगाशी जोडण्यासाठी ग्रंथालय हे सर्वोत्तम साधन आहे

ग्रंथालये आधुनिक तंत्रज्ञाशी जोडावीत
औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान अत्यंत अपुरे असते. त्यांना जगाशी जोडण्यासाठी ग्रंथालय हे सर्वोत्तम साधन आहे. ग्रंथालये अपडेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित असल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असे मत आज मान्यवरांनी एका परिसंवादात व्यक्त केले.
‘उर्दू किताब मेला’च्या निमित्ताने दररोज एका विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी ‘कुतूब व कुतूबखाना फहमी’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर येथे परिसंवाद आयोजित केला होता. यामध्ये दिल्ली विद्यापीठातील निवृत्त उर्दू विभागप्रमुख अतिक उल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालय विभागाचे डी. के. वीर, ग्रंथालयशास्त्र विभागाच्या वैशाली खापर्डे, प्राचार्य शहाबुद्दीन शेख, हमीद खान यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना वीर म्हणाले की, २००८ मध्ये विद्यापीठाच्या ग्रंथालयात रिसर्च पेपर १२ हजार होते. आज ही संख्या १ लाख ९५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. हे वाढणारे आकडे संशोधनवृत्ती वाढत असल्याचे सांगत आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमधील ग्रंथालये अत्याधुनिक असायला हवेत. बामु विद्यापीठाने मागील काही वर्षांमध्ये ग्रंथालयाचा कशा पद्धतीने कायापालट केला, अत्याधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरले जाते, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. अतिक उल्ला यांनी यावेळी नमूद केले की, शाळांमध्येही दर्जेदार पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजेत. वाचकाने अनेक पुस्तकांचा अभ्यास करून वास्तव शोधून काढले पाहिजे. ज्याला पुस्तक वाचण्याची सवय असते, तो कधीच एकटा राहू शकत नाही. यावेळी वैशाली खापर्डे, हमीद खान यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाबोद्दीन शेख यांनी पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक असते. चांगल्या आणि वाईट दिवसात कोण असते तर पुस्तकच असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकांचा वापर केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहंमद मुदस्सीर, तर आभार कलिमोद्दीन अन्सारी यांनी मानले.४
परिसंवाद : उर्दू साहित्य अकादमीतर्फे ‘बच्चों का अदब’. वेळ -सकाळी ११ वाजता. स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर.
४सकाळी ११ ते १- महिलांसाठी खास ‘मुजाकेरा-इस्लाहे मआशेरा’ या विषयावर विशेष कार्यक्रम.
४दुपारी २ ते ५ - महिलांसाठीच ‘बज़मे ख्वातीन’कार्यक्रमाचे आयोजन.
४सायंकाळी ६.३० वाजता महिला मुशायरा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुमताज मुनवर. यावेळी प्रा. राणा हैदरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात कवयित्री प्रज्ञा विकास, कमर सरवर, डॉ. नकिया आबेदी, मोनिकासिंह, शमशाद जलील शाद, अपर्णा कडस्कर, कनीज फातेमा सहभागी होणार आहेत.