पाच राज्यांतील ॲक्टिव्ह टोळीकडून ‘केवायसी’च्या नावाखाली बँक खात्यावर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:05 IST2021-07-22T04:05:07+5:302021-07-22T04:05:07+5:30
आर्थिक फसवणूक : बँकेतील पैसा सांभाळण्याचे मोठे आव्हान राम शिनगारे औरंगाबाद : मोबाइल सीम कार्ड, बँक आकाउंटची ‘केवायसी’ दाखल ...

पाच राज्यांतील ॲक्टिव्ह टोळीकडून ‘केवायसी’च्या नावाखाली बँक खात्यावर डल्ला
आर्थिक फसवणूक : बँकेतील पैसा सांभाळण्याचे मोठे आव्हान
राम शिनगारे
औरंगाबाद : मोबाइल सीम कार्ड, बँक आकाउंटची ‘केवायसी’ दाखल करण्यासाठी मेेसेज पाठविण्यात येतो. या मेसेजमध्ये ‘केवायसी’ दाखल करण्यासाठी ॲपची लिंकही देण्यात येते. हे ॲप डाऊनलोड केल्यास आपला सगळा डाटा सायबर गुन्हेगारांच्या हातात पडतो. त्यानंतर आपल्या बँक खात्यातून पैसे वळते केले जातात. हा गैरप्रकार एकाच वेळी पाच राज्यांतून चालतो. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांसमोर अनंत अडचणी येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशात डिजिटल इंडियाचे वारे वाहू लागल्यानंतर अनेक बँकांनी आपले बहुतांश व्यवहार हे ऑनलाइन केले आहेत. या ऑनलाइन बँकिंग व्यवहाराचे अनेक फायदे असताना तोटेही समोर येऊ लागले आहेत. अनेक आर्थिक गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांची फसवणूक करीत आहेत. कधी ‘केवायसी’च्या नावाखाली, तर कधी फोनवर बँक अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांकडून बँक अकाउंटची माहिती काढत आहेत. प्राप्त माहितीच्या आधारे नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे वळते करण्याच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात येत आहे. मात्र, तपासातही अनंत अडचणींचा डोंगर असल्याची माहिती समोर आली आहे. यातील गुन्हेगार एकाचवेळी पाच राज्यांतील विविध यंत्रणा ऑपरेट करीत असतात. त्यामुळे छोट्याशा आर्थिक फसवणुकीचा तपास पाच राज्यांत जाऊन करावा लागतो. हा तपास करण्यासाठी कामाच्या व्यापामुळे पोलिसांना तिथपर्यंत पोहोचताही येत नसल्याची वस्तुस्थिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली.
चौकट...........
अशी होते फसवणूक
ज्या नागरिकांची बँकेच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होते, ते औरंगाबादेतील असतात. जेथून फसवणूक झाली ते ठिकाण मध्यप्रदेशमध्ये असते. ज्या खात्यात पैसे जमा होतात ते राजस्थानमधील असते. ज्या मोबाइल सीम कार्डद्वारे फसवणूक झाली ते कार्ड आसाममधील असते. त्या सीम कार्डचा विक्रेता तामिळनाडूतील रहिवासी असतो. अशा प्रकारे एकाच गुन्ह्याच्या लिंक पाच राज्यांना जोडलेली असते.
चौकट.........
फसवणुकीचे उदाहरण
आपल्या मोबाइलवर एक सविस्तर मेसेज येताे. तो मेसेज आपले सीम कार्ड ‘केवायसी’मुळे बंद पडणार आहे. त्यामुळे तत्काळ आपण ‘केवायसी’ दाखल करावी. त्यासाठी ‘टीम व्हिवअर क्विक सपोर्ट’ ॲप डाऊनलोड करा, असे मेसेज येतात. बंद होण्याच्या भीतीमुळे अनेकजण तत्काळ ॲप डाऊनलोड करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करतात. त्यासाठी १० रुपये शुल्क आकारले जाते. हे शुल्क ऑनलाइन भरल्यामुळे आपल्या मोबाइलमधील सर्व डाटा सायबर गुन्हेगाराकडे जातो. त्यातून आपली फसवणूक केली जाते. आपल्या बँक खात्यातून पैसे वळते केल्याचा मेसेज आल्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचे समजते.
चौकट,
गेलेला पैसा परत मिळणे कठीण
ऑनलाइन लिंक ओपन करणे, आपल्या बँकेच्या डिटेल्स मोबाइलवरून कोणाला शेअर केल्यानंतर वळते झालेले पैसे पुन्हा परत मिळणे ही जवळपास अशक्य गोष्ट आहे. अनेक प्रकरणांत गुन्हेगारांचे लोकेशन शोधले जाते. फसवणूक कशी केली, त्याची उकल पोलीस करतात. मात्र, संबंधित व्यक्तीला गेलेले पैसे परत मिळाल्याचे उदाहरण शोधूनही सापडले नाही.
कोट,
तपासात अनेक अडचणी
अनेक नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होत आहे. बँकेतील पैसे वळते करण्याचा प्रकार वाढले आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी स्वत:च्या बँक डिटेल्स कोठेही शेअर करू नयेत. ऑनलाइन लिंक ओपन करू नये, माहिती नसणारे ॲप डाऊनलोड करू नयेत, हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याशिवाय अशा गुन्ह्यांना अटकाव घालता येणार नाही. गुन्हा घडल्यानंतर तपासात अनेक अडचणी येत आहेत. या प्रकारातील गुन्हे अनेक राज्यांतून एकाचवेळी करण्यात येतात. तिथपर्यंत पोहचणे अनेकदा शक्य होत नाही.
- गीता बागवडे, पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम