तेवीस व्यावसायिकांवर कारवाई
By Admin | Updated: December 28, 2014 01:14 IST2014-12-28T01:13:05+5:302014-12-28T01:14:53+5:30
तुळजापूर : शहरातील रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने आणि बेशिस्तपणे उभा केलेल्या वाहनांवर पालिकेने विशेष मोहीम राबवून कारवाई केली.

तेवीस व्यावसायिकांवर कारवाई
तुळजापूर : शहरातील रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने आणि बेशिस्तपणे उभा केलेल्या वाहनांवर पालिकेने विशेष मोहीम राबवून कारवाई केली. दिवसभरात जवळपास २३ व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
सध्या नाताळाची सुट्टी असल्याने देवीदर्शनासाठी तुळजापूर येथे भाविकांची गर्दी होत आहे. प्रत्येकजण आपले वाहन मंदिराच्या जवळपर्यंत कसे नेता येईल याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील कमानवेस, महाद्वार चौक, भवानी रोड आदी ठिकाणी खाजगी चारचाकी, दुचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केल्याचे दिसते. त्यामुळे पादचाऱ्यांसोबतच भाविकांनाही याचा फटका बसत आहे. तसेच व्यापारी आपल्या दुकानांसमोर फळ्या टाकून साहित्याची मांडणी करतात. तर काही दुकानदारांनी सावलीसाठी दुकानांसमोर पत्र्याचे अथवा कापडाचे तात्पुरते छत टाकले आहेत. ही बाब लक्षात घेवून शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत नगर परिषदेने अतिक्रमण हटाव व वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. आंबेडकर चौक, भवानी रोड, महाद्वार चौक, मुख्य रस्ता, कमानवेस या भागातील रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या टपऱ्या, हातगाडे, वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच पालिकेने निश्चित करुन दिलेल्यापेक्षा अधिकच्या जागेवर ज्या दुकानदारांनी साहित्य मांडलेले होते त्यांच्या अशा २३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर उभी असलेली वाहने वाहनतळावर नेण्याच्या सूचना केल्या. (वार्ताहर)४
थकित कर वसुलीसाठी तुळजापूर नगर परिषदेने मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी पालिकेच्या वतीने तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्यांच्या कक्षाला सीलही ठोकण्यात आले होते. थकित कर वसुलीसाठी सर्वच शासकीय कार्यालये, महाविद्यालयांच्या विरोधात आता पालिकेने जोरदार मोहीम उघडली आहे. तुळजापूर येथील मंदिर संस्थानच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडेही मालमत्ता करापोटी २५ लाख ६७ हजार ९१२ तर पाणी पट्टीपोटी ४ लाख ३ हजार ६९० रूपये अशी एकूण २९ लाख ७१ हजार ६०२ रूपयांची रक्कम थकीत आहे. याच्या वसुलीसाठी पालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी प्राचार्यांच्या कक्षाला सील ठोकले.
कारवाईमध्ये नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक महादेव सोनार, अतिक्रमण हटाव मोहिमेचे पथकप्रमुख चव्हाण, एम.आय. शेख, दत्ता साळुंके यांच्यासह ४५ कर्मचारी सहभागी होते. या मोहिमेसाठी १ जेसीबी, ३ ट्रॅक्टर, २ टमटम, १ क्रेनचा वापर करण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक पठाण यांच्यासह ९ कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.