वैजापुरात वाळू माफियांवर कारवाई
By Admin | Updated: May 6, 2014 11:03 IST2014-05-05T22:19:01+5:302014-05-06T11:03:32+5:30
४३ लाख रुपयांची १४४० ब्रास वाळू जप्त

वैजापुरात वाळू माफियांवर कारवाई
४३ लाख रुपयांची १४४० ब्रास वाळू जप्त
वैजापूर : तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर वाळूची साठेबाजी करून ठेवणार्या वाळू माफियांविरुद्ध सोमवारी महसूल अधिकार्यांनी धडाकेबाज कारवाई केली. महसूल विभागाने तालुक्यात १५ ठिकाणी छापे टाकून ४३ लाख रुपये किमतीची १४४० ब्रास अवैध वाळू जप्त केली असून, १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तालुक्यातील गोदापात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. निवडणुकीच्या कामाच्या नावाखाली या तस्करीकडे दुर्लक्ष केले. अवजड वाहनांमधून होणार्या वाळू वाहतुकीमुळे तालुक्यातील गंगथडी भागातील रस्ते अक्षरश: मरणपंथाला लागले आहेत. याबाबत गंगथडी भागातील ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या; परंतु अधिकार्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. स्थानिक अधिकार्यांच्या नाकर्तेपणामुळे वरिष्ठ अधिकार्यांना या बाबीची दखल घ्यावी लागली.
सुटी असूनही रविवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी गंगथडी भागात जाऊन पाहणी केली असता त्यांना गोदानदीच्या काठावर अनेक अवैध वाळू साठे आढळून आले. त्यामुळे लवांडे यांनी स्थानिक संबंधित अधिकार्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे, तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन, वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे, खनिकर्म अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने सोमवारी तालुक्यातील पुरणगाव येथील मधुकर ठोंबरे, रामा ठोंबरे, सूरज ठोंबरे, मिथुन ठोंबरे, लाखगंगा येथील रमेश सोनवणे, प्रवीण तुरकणे, प्रभाकर पडवळ, बाभूळगावगंगा येथील सोपान तुरकणे, सुभाष तुरकणे, विठ्ठल तुरकणे, वाल्मीक तुरकणे, राजू बोराडे, जालिंदर कुंजीर व बाबासाहेब कुंजीर या १५ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.