कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई सुरू
By Admin | Updated: June 28, 2016 00:52 IST2016-06-28T00:41:54+5:302016-06-28T00:52:42+5:30
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांच्या कामांची वर्कआॅर्डर घेऊनही अनेक वर्षे काम न करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली आहे

कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई सुरू
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांच्या कामांची वर्कआॅर्डर घेऊनही अनेक वर्षे काम न करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली आहे. शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी युद्धपातळीवर अहवाल दिल्यावर आयुक्त स्वत: निर्णय घेणार आहेत.
महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी शहरातील विकासकामांसाठी आढावा बैठक घेतली. शहरातील २५६ रस्त्यांच्या कामांची वर्कआॅर्डर घेऊनही काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा, असा आदेश महापौरांनी पंधरा दिवसांपूर्वी दिला होता. या प्रकरणात प्रशासनाने काय केले, असा प्रश्न आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आला. किती कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली, अशी विचारणा महापौरांनी केली. आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून खुलासा मागितला. मात्र, अधिकाऱ्यांना ठोस उत्तर देता आले नाही. मला सायंकाळपर्यंत अहवाल द्या, असे आदेश आयुक्तांनी शहर अभियंता पानझडे यांना दिले. अहवाल न आल्यास तुम्हाला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिला.
मिटमिटा भागातील शासनाच्या गायरान जमिनीवर सफारी पार्क उभारण्याचा मनपाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी शंभर एकर जागा मोफत मिळावी म्हणून प्रशासनाच्या वतीने नव्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यात पालकमंत्री रामदास कदम यांनी सफारी पार्कच्या संरक्षण भिंतीसाठी नगरोत्थान योजनेतून निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रशासनाने १५ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे.
सातारा-देवळाईसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या वॉर्ड कार्यालयासाठी जागा शोधण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती बैठकीनंतर महापौरांनी दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यासाठी तीन स्वतंत्र डिझाईन तयार करण्यात आले आहेत.