पंढरपुरात ५५ बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:36 IST2018-12-15T18:36:21+5:302018-12-15T18:36:35+5:30
वाळूज वाहतूक शाखा पोलिसांनी शनिवारी पंढरपूर व नगर महामार्गावर कारवाईचा बडगा उगारत ५५ बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली.

पंढरपुरात ५५ बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई
वाळूज महानगर : वाळूज वाहतूक शाखा पोलिसांनी शनिवारी पंढरपूर व नगर महामार्गावर कारवाईचा बडगा उगारत ५५ बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली.
वाळूज महानगरात बेशिस्त वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगी वाहतुकीसह प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक मुख्य रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. तसेच महामार्गावरील चौक व बाजारपेठेत पार्किंगची व्यवस्था नसल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची वाहनेही रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे यांनी बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरु केली आहे.
या मोहिमेंतर्गत शनिवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पंढरपुरातील तिरंगा चौक, पंढरपूर चौक, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, कामगार चौक, ए एस क्लब लिंक रोड चौक आदी ठिकाणी ५५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या पण चालक नसलेल्या अनेक वाहनांची हवा सोडून देत वाहनांना जॅमर लावले. ही कारवाई निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर कवडे, राजेंद्र उदे, संजय पाटील, शमसोद्दीन कादरी, श्रीकांत सुरेवाड, इरफान पठाण, देविदास दहिफळे, सतिश माजनकर, मोतीलाल महेर आदीच्या पथकाने केली.