दारूड्यांचा अ‍ॅसिड हल्ला

By Admin | Updated: March 18, 2016 00:22 IST2016-03-18T00:22:02+5:302016-03-18T00:22:02+5:30

वाळूज महानगर : प्यायला उधारीवर दारू दिली नाही म्हणून चिडलेल्या दोन दारूड्यांनी दारू दुकानातील दोन नोकरांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले.

Acid attack | दारूड्यांचा अ‍ॅसिड हल्ला

दारूड्यांचा अ‍ॅसिड हल्ला

वाळूज महानगर : प्यायला उधारीवर दारू दिली नाही म्हणून चिडलेल्या दोन दारूड्यांनी दारू दुकानातील दोन नोकरांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री बजाजनगर येथील देशी दारू दुकानावर घडली.
या अ‍ॅसिड हल्ल्यात सतीश घोरपडे ( २५, रा. आडगाव, ता. भोकरदन, जि.जालना, सध्या बजाजनगर) व शरद साळवे (३०, रा. बजाजनगर) हे दोघे गंभीर जखमी झाले. हल्ला करणाऱ्या अशोक गव्हारे (३५) व प्रकाश जरारे (३८, रा. रांजणगाव शेणपुंजी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बजाजनगरात जैस्वाल यांचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानावर सतीश आणि शरद हे दोघे कामाला आहेत. बुधवारी रात्री नित्याप्रमाणे दोघे दुकानात दारूची विक्री करीत होते. साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपी अशोक गव्हारे व प्रकाश जरारे हे तेथे आले. त्यांनी सतीशकडे दारूची मागणी केली. सतीशने पैसे मागितले. आरोपींनी नंतर देतो, सध्या नाहीत, उधार दारू पाज, असे म्हटले. त्यावर सतीशने नकार दिला. वारंवार विनवणी करूनही उधार दारू देत नसल्याने दोन्ही आरोपी चिडले आणि त्यांनी दुकानातील काचेचे ग्लास व दारूची बाटली फोडून गोंधळ घालायला सुरुवात केली.
तेव्हा शरद साळवे याने या दारूड्यांना दुकानातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. यावरून शरद व या दारूड्यांमध्ये बाचाबाची झाली. त्याचक्षणी चिडलेल्या अशोक गव्हारे याने अचानक त्याच्या हातातील पांढऱ्या कॅनमध्ये असलेले अ‍ॅसिड काऊंटरवर असलेल्या सतीश व शरद यांच्या अंगावर फेकले. यात सतीशच्या हातावर व मांडीवर तर शरदच्या शरीराच्या समोरील भागावर अ‍ॅसिड पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकाराने तेथे एकच धावपळ उडाली. मग तेथे दारू पीत बसलेल्या इतरांनी मोठ्या शिताफीने या दोन्ही आरोपींना पकडले व त्यांच्याकडील अ‍ॅसिडने भरलेली कॅन हिसकावून घेतली. या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तेथे धाव घेतली. नागरिकांनी पकडून ठेवलेल्या अशोक व प्रकाशला अटक केली. नंतर अ‍ॅसिड हल्ल्यात भाजलेल्या दोन्ही नोकरांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
गुरुवारी फौजदार राहुल भदरगे, पोहेकॉ. संतोष जाधव यांनी पंचनामा केला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अशोक व प्रकाशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार राहुल भदरगे करीत आहेत.

Web Title: Acid attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.